शाळेच्या वेळा पाळून शमशाद गरजू रुग्णांना मदत करण्याचे काम करतात. अनेक संस्थांशी त्यांचा ऋणानुबंध आहे. वृद्ध, अनाथ मुलांचे संगोपन करतात. या दोन्ही घटकांसाठी पुढील काळात ठोस काम करण्याची त्यांची इच्छा आहे. महाराष्ट्राच्या विविध भागात या सामाजिक कार्याच्या निमित्ताने त्यांची भ्रमंती असते. या सेवा कार्यातून शमशाद बेगम यांना आदर्श शिक्षिकेसह ६५ हून अधिक विविध प्रकारचे पुरस्कार मिळाले आहेत.

कुराण, बायबलसह हिंदू धर्मग्रंथांचा अभ्यास करणाऱ्या शमशाद बेगम छबुलाल मुल्ला गेल्या दहा वर्षांपासून विद्यार्थ्यांना रामायण कथेच्या माध्यमातून भारतीय जीवन पद्धती, संस्कार, सर्वधर्मसमभावाचे धडे देत आहेत. माणूस आणि माणुसकी हा एकच धर्म आहे. हे ग्रंथातील भाव विद्यार्थ्यांवर बिंबवून त्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी त्या प्रयत्नशील आहेत. रुग्ण, अनाथ, वृद्ध यांच्या सेवा करण्याची आवड असलेल्या शमशाद डोंबिवलीतील रामनगरमधील हिंदी हायस्कूलमध्ये मराठीच्या शिक्षिका आहेत.
 विश्व हिंदू परिषदेच्या रामायण अभ्यास कथा मंडळाचे डॉ. सुधीर कुलकर्णी यांच्या पुढाकाराने गेल्या अनेक वर्षांपासून रामायणावर आधारित परीक्षा घेतली जाते. विद्यार्थ्यांमध्ये रामायणात घडलेल्या घटना, त्याचा आताच्या जीवन पद्धतीशी असलेला संबंध, संस्कार, घरातील आई, वडील, वृद्ध यांचा सन्मान करण्याची विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासूनच आवड निर्माण व्हावी या उद्देशाने आयोजित करण्यात येणाऱ्या या परीक्षेच्या अभ्यासाची सर्व तयारी करून घेण्याचे काम अनेक वर्षांपासून शिक्षिका शमशाद आवडीने करीत आहेत. आतापर्यंत सुमारे एक हजाराहून विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आहे.
हिंदी हायस्कूलमधील सहावीचे विद्यार्थी परीक्षेला बसवले जातात. शाळा सुटल्यानंतर रामायण परीक्षेसाठी एक तास नियमित अभ्यास घेतला जातो. विद्यार्थी या अभ्यासाच्या माध्यमातून घरात पालक, आजी-आजोबांना अनेक प्रश्न करतात. त्यांना सकाळीच नमस्कार करण्यास सुरुवात करतात. राम कथेवरील टीव्ही मालिका बघून विद्यार्थी काही प्रश्न उपस्थित करतात. घरातील प्रत्येक व्यक्तीशी विशेषत: आजी-आजोबांशी सुसंवाद वाढावा हाही यामागील उद्देश आहे. वृद्ध मंडळी वृद्धाश्रमात असतात. हे प्रमाण कमी व्हावे. सर्व धर्मग्रंथांमध्ये माणूस हा एकच धर्म आहे. त्यामुळे होणाऱ्या दंग्याधोप्यांमधून माणसाचे नुकसान होते. हे सगळे विषय रामायण कथेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकवले जातात, असे शमशाद यांनी सांगितले. या परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांना सन्मानित केले जाते. या परीक्षेच्या माध्यमातून शाळेला दोन वेळा फिरता चषक मिळाला आहे, असेही त्या म्हणाल्या.