पंचगंगा नदीमध्ये मैलायुक्त सांडपाणी सोडले जात असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आणून देऊनही कारवाईबाबत दिरंगाई केली जात असल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी शिवसेनेच्या वतीने प्रशासनाचा पुतळादहन व शंखध्वनी आंदोलन करण्यात आले. इचलकरंजीतील जनता चौकात करण्यात आलेल्या आंदोलनावेळी प्रदूषण नियंत्रण मंडळ, कोल्हापूर महापालिका, जिल्हा प्रशासन यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.
    कोल्हापुरातील पंचगंगा नदीमध्ये महापालिकेच्या टँकरमधून मैलायुक्त सांडपाणी सोडण्याचा प्रकार शिवसेनेने दोन दिवसांपूर्वी उघडकीस आणला होता. त्यावरून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. तसेच टँकरची मोडतोड केली होती. हा विषय निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना महापालिकेवर फौजदारी दावा करण्याचा आदेश दिला होता. तथापि, या बाबतीत कसलीच कारवाई न झाल्याने शिवसेनेच्या वतीने शुक्रवारी आंदोलन करण्यात आले. इचलकरंजीतील कॉ. मलाबादे चौकामध्ये जमलेल्या शिवसैनिकांनी प्रदूषण नियंत्रण मंडळ, कोल्हापूर महापालिका व जिल्हा प्रशासनाच्या निषेधाच्या घोषणा देत शंखध्वनी केला. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्याच्या प्रतीकात्मक पुतळय़ाचे दहन शंखध्वनीच्या निनादात करण्यात आले. पोलिसांनी पुतळा हिसकावण्याचा प्रयत्न केला. पण आंदोलकांनी तो हाणून पाडला. आंदोलनात जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, उपजिल्हाप्रमुख मधुकर पाटील, मालकारी लवटे, शहरप्रमुख धनाजी मोरे, नगरसेवक महादेव गौड, सयाजी चव्हाण, शिरोळ तालुकाप्रमुख सतीश मलमे, राजू आलासे, मनोज भाट, शिक्षण मंडळ सदस्य महेश बोहरा,महिला तालुकाप्रमुख माधुरी टकारे, मंगल मुसळे, शोभा कोलप, अण्णा बिलोरे, सचिन खोंद्रे आदींनी आंदोलनात भाग घेतला.
फोटोओळी – १) पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यास दिरंगाई होत असल्याच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने इचलकरंजीत शंखध्वनी आंदोलन करण्यात आले. यामध्ये जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, इचलकरंजी शहरप्रमुख धनाजी मोरे, शिरोळ तालुकाप्रमुख सतीश मलमे आदींचा सहभाग होता.
 

Story img Loader