जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष व सहकार महर्षी डॉ.वा.रा.उपाख्य अण्णासाहेब कोरपे यांच्या प्रेरणाशिल्पाच्या अनावरणाच्या निमित्ताने केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अनेक राजकीय नेते सोमवार, २१ ऑक्टोबरला अकोल्यात येत आहेत. त्याच अनुषंगाने शेतकरी महामेळावाही होत आहे.
सहकार महर्षीच्या प्रयत्न आणि कष्टाने उभ्या झालेल्या या जिल्हा सहकारी बँकेच्या केसीसी रूपे कार्डचा शुभारंभही यावेळी होणार आहे. या सर्वच कार्यक्रमास केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, मुख्यमंत्री पृथ्वीराज  चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल आदी मोठे नेते या निमित्ताने शहरात येत आहेत. अकोला क्रिकेट क्लबच्या मैदानावर सकाळी १० वाजता शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून वनमंत्री पतंगराव कदम, सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासह अनेक मंत्री या महामेळाव्यास उपस्थित राहणार असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष डॉ. संतोष कोरपे यांनी दिली.
अकोला व वाशीम जिल्ह्य़ातील दोन लाखाहून अधिक शेतकऱ्यांना केसीसी रूपे कार्डच्या माध्यमातून अनेक सुविधा प्राप्त होणार आहेत. हे कार्ड देशातील कोणत्याही बँकेच्या कोणत्याही एटीएममध्ये वापरता येणार आहे, असे कोरपे म्हणाले. अण्णासाहेब कोरपे यांच्या प्रेरणाशिल्प ब्रांझ धातूूमध्ये तयार करण्यात आले असून चंद्रजित यादव हे त्याचे शिल्पकार आहेत. बँकेच्या मुख्य शाखेतील प्रांगणात हे शिल्प उभारण्यात आले आहे. या सर्व कार्यक्रमास अकोला व वाशीम जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या समारंभासाठी २ हजार चौरस फुटाचे भव्य व्यासपीठ उभारण्यात येणार असून ३ लाख चौरस फुटाचा सभा मंडप राहणार आहे. या कार्यक्रमास दीड लाखापेक्षा जास्त शेतकरी उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
केंद्र व राज्य सरकारमधील मंत्री येत असल्याने ठिकठिकाणावरून लोक येतील. त्यांच्या वाहन व्यवस्थेसाठी वाहनतळाची १२ ठिकाणी सोय करण्यात आली आहे. एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर मंत्री  येणार असल्याने कार्यक्रमास मोठी गर्दी होणार आहे. विशेष म्हणजे, हा संगीतमय कार्यक्रम असणार आहे,अशी माहिती डॉ.संतोष कोरपे यांनी दिली. यानिमित्ताने अकोला शहर व जिल्हा ठवळून निघणार आहे. शेतकरी महामेळावा होत असल्याने त्यात शेतकऱ्यांसाठी काही तरी घोषणाही होईल, असे सध्याचे वातावरण पाहता दिसते. अण्णासाहेब कोरपेंच्या संदर्भाने का होईना दोन्ही काँग्रेसचे दिग्गज नेते येथे पायधूळ झाडणार आहेत.

Story img Loader