केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ‘मराठवाडय़ाचा युवा वक्ता’ या आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पध्रेचे आयोजन केले आहे. लातूर जिल्हानिहाय फेरी मंगळवारी (दि. ७) सकाळी दहापासून शहरातील राजर्षी शाहू महाविद्यालयात होणार असल्याचे आमदार सतीश चव्हाण यांनी सांगितले.
आमदार चव्हाण यांच्यातर्फे ही स्पर्धा घेतली जाते. स्पध्रेचे हे चौथे वर्ष आहे. मागील तीन वर्षांत स्पध्रेस चांगला प्रतिसाद मिळाला. केवळ व्यासपीठाअभावी विद्यार्थ्यांना आपले विचार मांडता येत नव्हते. त्यामुळे स्पध्रेच्या माध्यमातून मराठवाडय़ातील विद्यार्थ्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, त्यांच्या वैचारिक क्षमतेला वाव मिळावा, हा स्पर्धा योजनेमागचा मुख्य उद्देश असल्याचे चव्हाण म्हणाले.
जादूटोणाविरोधी विधेयकाबद्दल माझी भूमिका, वाचायचे की नाचायचे, संघर्षांतून साकारलेले समाजाचे शिल्पकार, आई-बाबांना सांभाळायला कायदा हवा का, हे चार विषय आहेत. जिल्हानिहाय फेरीतील पहिल्या ३ विजेत्या स्पर्धकांना अनुक्रमे ३, २ व १ हजार रुपयांची रोख पारितोषिके, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र दिले जाईल.
मराठवाडय़ाच्या आठही जिल्हय़ांतील २४ विजेत्या स्पर्धकांची महाअंतिम फेरी १३ जानेवारीला औरंगाबादला देवगिरी महाविद्यालयात होणार आहे. महाअंतिम फेरीसाठी गोदातीरी तहानलेला मराठवाडा, माध्यमांचा गलका; संपादकांचा तहलका, विद्यार्थ्यांशिवाय चळवळी नि चळवळीशिवाय विद्यार्थी, जीवनाला काटेरी डंक आहेत डोळे उघडे ठेवून पहा, ते तर फुलपाखरांचे पंख आहेत असे विषय आहेत.
महाअंतिम फेरीतील पहिल्या ३ विजेत्यांना अनुक्रमे १५, १० व ५ हजारांची रोख पारितोषिके, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र दिले जाईल. स्पर्धा मराठवाडय़ातील पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी असून, एका महाविद्यालयातील ३ विद्यार्थ्यांनाच सहभाग घेता येईल. स्पध्रेसाठी कोणतेही शुल्क नाही. इच्छुक विद्यार्थ्यांनी महाविद्यालय ओळखपत्र, प्राचार्याचे संमतिपत्र, दोन पासपोर्ट फोटोंसह स्पध्रेदिवशी एक तास आधी स्पर्धा ठिकाणी नावनोंदणी करावी, असे आवाहन संयोजन समितीचे प्रा. डॉ. महादेव गव्हाणे, प्रा. अंकुश नाडे, आत्माराम कांबळे आदींनी केले आहे.