राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शहरात ८ ते १२ डिसेंबर दरम्यान ‘शरद पवार बुक फेस्ट-२०१२’ आयोजित करण्यात आले आहे. ‘आदि फौंडेशन’मार्फत सावेडीतील जॉगिंग ट्रॅक मैदानावर होणाऱ्या या उपक्रमात पुस्तक प्रदर्शन, प्रसिद्ध व्यक्तींच्या प्रकट मुलाखती (संवाद) व स्थानिक कलावंतांचे सांस्कृतिक, संगीत, गायन असे कार्यक्रम होणार आहेत. पुस्तक प्रदर्शनात खरेदीवर २० ते ३० टक्के सवलतही आहे.
फौंडेशनचे अध्यक्ष, माजी आमदार राजीव राजळे यांनी ही माहिती दिली. नगरकरांसाठी ही सांस्कृतिक मेजवानी ठरेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. ‘बुक फेस्ट’मध्ये रोज सायंकाळी नामवंत लेखक, कलावंत, सामाजिक कार्यकर्ते यांच्याशी संवादाचा कार्यक्रम होणार आहे. त्यामध्ये प्रसिद्ध लेखक विठ्ठल कामत, दिग्दर्शक महेश मांजरेकर, अभिनेता व भ्रमंतीकार मिलिंद गुणाजी, संगणक तज्ज्ञ विजय भटकर यांच्याशी वाचकांची भेट होणार आहे.
उद्घाटन ८ डिसेंबरला सायंकाळी ५ वाजता गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या हस्ते होईल. यावेळी त्यांची प्रकट मुलाखतही घेतली जाणार आहे. पवार यांचे मराठी सारस्वतासाठी दिलेले योगदान, तसेच युवा पिढीत वाचनाची गोडी निर्माण व्हावी, मान्यवर लेखकांचा परिचय व्हावा या उद्देशाने हा उपक्रम आयोजित केल्याचे राजळे यांनी सांगितले. पुस्तक प्रदर्शनात राज्यातील मान्यवर प्रकाशकांचे किमान ५० स्टॉल असतील. त्यामध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी, ऊर्दू साहित्यांसह धार्मिक, ऐतिहासिक, आरोग्य, काव्य, संतविषयक, खेळ, पाककला, शैक्षणिक, स्पर्धा परिक्षा विषयक, नाटक, चरित्र आदी दालने असतील. स्टॉलचे बुकिंग सुरू असून बुकिंगसाठी उदय एजन्सीचे वाल्मिक कुलकर्णी (९८२२३७०७५१) यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन त्यांनी केले.
पुस्तक प्रदर्शनाच्याच ठिकाणी रोज सायंकाळी ६ वाजता प्रकट मुलाखतीचा ‘संवाद’ कार्यक्रम व रोज रात्री ८ वाजता स्थानिक कलावंतांच्या अविष्काराचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी फौंडेशनचे संयोजक किशोर मरकड व अक्षय चेमटे उपस्थित होते.
दि. ५ला शास्त्रीय गायन
बुक फेस्टशिवाय राजीव राजळे यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही ५ डिसेंबरला सहकार सभागृहात स्नेहमेळावा व शास्त्रीय गायन मैफलीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सकाळी १० वाजता होणाऱ्या स्नेहमेळाव्यात ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांचे व्याख्यान होईल. आमदार डॉ. सुधीर तांबे कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील व सायंकाळी ५.३० वाजता ख्यातनाम शास्त्रीय गायिका अश्विनी भिडे-देशपांडे यांच्या गायनाचा कार्यक्रम होईल.
डिसेंबरमध्ये नगरला ‘शरद पवार बुक फेस्ट’
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शहरात ८ ते १२ डिसेंबर दरम्यान ‘शरद पवार बुक फेस्ट-२०१२’ आयोजित करण्यात आले आहे. ‘आदि फौंडेशन’मार्फत सावेडीतील जॉगिंग ट्रॅक मैदानावर होणाऱ्या या उपक्रमात पुस्तक प्रदर्शन, प्रसिद्ध व्यक्तींच्या प्रकट मुलाखती (संवाद) व स्थानिक कलावंतांचे सांस्कृतिक, संगीत, गायन असे कार्यक्रम होणार आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 20-11-2012 at 03:17 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar book festival now in nager in december