केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार गुरुवारी (दि. २१) येथे येणार असून राज्यमंत्री फौजिया खान यांच्या संकल्पनेतून जिल्ह्य़ात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य शिक्षण, पोषण, जनजागरण व जनसंवाद अभियानाच्या पाश्र्वभूमीवर पवार यांच्या उपस्थितीत एकदिवसीय प्रबोधन शिबिराचा समारोप होणार आहे. तसेच पवार यांच्या हस्ते आरोग्य खात्याच्या तीन इमारतींचे उद्घाटन होणार आहे. शुक्रवारी (दि. २२) मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या पदवीदान समारंभासही पवार उपस्थित राहणार आहेत. प्रजासत्ताक दिनी मंत्री फौजिया खान यांच्या संकल्पनेतून जिल्ह्य़ात शिक्षण, पोषण, जनजागरण व जनसंवाद मोहीम सुरू झाली. मोहिमेंतर्गत जिल्ह्य़ात ३० गावांमध्ये गावकऱ्यांशी संवाद साधून गावाचे प्रश्न जाणून घेण्यात आले. जिल्हाधिकारी, जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक आदींनी मोहिमेत सहभाग नोंदविला. गावपातळीवरील तलाठी, ग्रामसेवक हे घटक मोहिमेत असल्याने अनेक प्रश्न स्थानिक पातळीवरच सोडविण्यात आले. हे अभियान जिल्ह्य़ातल्या सर्व तालुक्यांत राबविण्यात येणार आहे. हे अभियान राबविण्यात आले, त्या गावातील ग्रामस्तरीय समितीचे सरपंच, उपसरपंच, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, मुख्याध्यापक, वैद्यकीय अधिकारी, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका आदी घटकांच्या उपस्थितीत प्रबोधन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिराचा समारोप सायंकाळी नूतन महाविद्यालयाच्या प्रांगणावर होणार आहे. पालकमंत्री प्रकाश सोळंके, राज्यमंत्री फौजिया खान, सुरेश वरपुडकर, जि. प. अध्यक्षा मीना बुधवंत, महापौर प्रताप देशमुख आदींसह लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एकनाथ माले व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता आर. एन. पटवेकर यांनी केले आहे.

Story img Loader