देशात सुसंस्कृत राजकरणी म्हणून नावलौकिक प्राप्त केलेल्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांना त्यांच्या धर्मपत्नी वेणूताईंनी मनोभावे साथ दिली म्हणूनच ‘हिमालयावर येता घाला सह्यगिरी हा धावून गेला’ असा इतिहास निर्माण करण्याचे धैर्य यशवंतरावांच्या लेखी निर्माण झाले असल्याचे प्रतिपादन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले.
वेणूताई चव्हाण ट्रस्टच्या वेणूताई चव्हाण स्मारक सभागृहाच्या नूतनीकरणानंतरचा लोकार्पण सोहळा पवार यांच्या हस्ते थाटात पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त राज्याचे अर्थ व ग्रामविकासमंत्री जयंत पाटील अध्यक्षस्थानी होते.  तर पालकमंत्री रामराजे निंबाळकर, माजी खासदार श्रीनिवास पाटील, कल्लापाण्णा आवाडे, ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त आमदार बाळासाहेब पाटील, विलासराव वाठारकर, यशवंतरावांचे पुतणे अशोकराव चव्हाण, प्रभाताई कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. वेणूताई चव्हाण स्मारकाचे नूतनीकरण करणारे प्रसिध्द काँट्रॅक्टर विजय शिर्के यांचा याप्रसंगी शरद पवार यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला.
शरद पवार म्हणाले की, यशवंतरावांनी स्वातंत्र्य चळवळीत उडी घेतली त्यावेळी वेणूताई यांनी त्यांना मोलाची साथ केली तेव्हा ब्रिटिशांकडून वेणूताईंना त्रास देण्यात आला. त्या त्रासाचा परिणाम वेणूताईंना जन्मभर सोसावा लागला. चव्हाणसाहेबांनी  देशासाठी सर्वस्व दिले. त्या यशवंतरावांची जीवनसाथी म्हणून वेणूताईंनी विनम्रपणे सेवा केली. त्या वेणूताईंची अखेरची इच्छा म्हणून हे स्मारक कराड येथे उभे करण्यात आले आहे. वेणूताई चव्हाण सांस्कृतिक केंद्र सुसंस्कृत समाज घडवणारे असून, हे स्मारक सभागृह कराडच्या लौकिकात भर घालेल, या स्मारकातील अभ्यासकेंद्रात अनेक विद्यार्थी निर्माण व्हावेत, नव्या पिढीने स्वर्गीय यशवंतराव व वेणूताईंचा आदर्श पुढे न्यावा असे आवाहन पवार यांनी केले. समाजाची सांस्कृतिक उंची वाढवणारे यशवंतराव साहित्य, संस्कृती, कला-क्रीडा अशा सर्वच क्षेत्रात आपले योगदान देणारे द्रष्टे नेते होते. त्यांचे एकंदर कार्य गौरवास्पद असल्याचा गुणगौरव त्यांनी केला. जयंत पाटील म्हणाले की, यशवंतराव चव्हाण वेळोवेळी परदेशी असताना त्यांनी वेणूताईं यांना लिहिलेली पत्रे हा साहित्यिक खजिना ठरेल, हे नवसाहित्य नव्या पिढीपुढे आले पाहिजे. वेणूताई चव्हाण यांचे स्मारक कराडच्या शिरपेचात मानाचा तुरा ठरला आहे. चालू वर्ष हे यशवंतरावांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. या वर्षांत चव्हाणसाहेबांच्या विचारांचा देशभर जागर होत आहे हे त्यांच्यासारख्या विद्वान राजकीय नेत्याला वंदन ठरेल असे ते म्हणाले.
वेणूताई चव्हाण सभागृहाच्या नूतनीकरणाचे काम प्रसिध्द वास्तुविशारद बी. जी. शिर्के आणि कंपनीने अतिशय नेटके , सुंदर व दर्जेदार केले आहे. काही दिवसांपूर्वी बेळगावात उद्घाटनावरून वादात सापडलेल्या सुवर्णसौधच्या वास्तूची उभारणी एका मराठी माणसाने बांधली आहे, याचा आम्हाला अभिमान वाटतो. अशा शब्दात शरद पवारांनी विजय शिर्के यांचे कौतुक केले.
कार्यक्रमाला आमदार विक्रमसिंह पाटणकर, मानसिंगराव नाईक, शशिकांत शिंदे, नगराध्यक्षा प्रा.उमा हिंगमिरे, माजी नगराध्यक्षा शारदा जाधव यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक श्रीनिवास पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शोभना रैनाक यांनी केले, तर बाळासाहेब पाटील यांनी आभार मानले.  

Story img Loader