केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना दुष्काळग्रस्तांसाठी थेट निधी देण्याचा अधिकार असताना ते दुष्काळी दौरे काढून खोटे अश्रू  कशसाठी ढाळत आहेत, असा सवाल काँग्रेसचे माजी मंत्री प्रतापसिंह मोहिते-पाटील यांनी उपस्थित केला आहे. दुष्काळ तथा पाणी प्रश्नावर मोहिते-पाटील यांनी पवार काका-पुतण्याविरोधात उघड व आक्रमक भूमिका घेतल्याने हा पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणात चर्चेचा विषय ठरला आहे.
दुष्काळी परिस्थितीवरील उपाययोजनांसाठी केंद्र सरकारच्या समितीचे केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार हेच अध्यक्ष आहेत, तर केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे हे या समितीचे सदस्य आहेत. समितीचे अध्यक्ष शरद पवार हे माढय़ातून आणि सदस्य सुशीलकुमार शिंदे हे सोलापुरातून लोकसभेवर निवडून गेले असतानाही जर सोलापूर जिल्ह्य़ास दुष्काळी परिस्थितीत पाणी मिळत नसेल, तर मग त्यांच्या खासदारकीचा उपयोग काय, असाही सवाल प्रतापसिंह मोहिते-पाटील यांनी उपस्थित केला आहे.
अकलूज येथे एका धार्मिक कार्यक्रमाप्रसंगी बोलताना मोहिते-पाटील यांनी दुष्काळी परिस्थितीवर भाष्य करताना राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणाबद्दल संताप व्यक्त  केला. या वेळी त्यांचे पुत्र तथा सदाशिवनगरच्या शंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.
ते म्हणाले, सोलापूरच्या दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्याच्या नावाखाली शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार हे दौऱ्यावर दौरे काढून शासनाचा लाखोंची रक्कम खर्च करीत आहेत. परंतु त्यांच्या दौऱ्यांतून दुष्काळी भागातील जनतेला कसलाही दिलासा मिळाला नाही. असे वांझोटे दौरे काढण्यापेक्षा तोच पैसा निधीच्या स्वरूपात दुष्काळी भागासाठी खर्च केला असता, तर किमान दुष्काळग्रस्तांची सुटका तरी होईल, असे परखड भाष्यही मोहिते-पाटील यांनी केले. शरद पवार यांच्या दुष्काळी दौऱ्याच्या वेळी पुणे जिल्ह्य़ातून उजनी धरणात पाणी सोडण्याची मागणी दुष्काळग्रस्त शेतक ऱ्यांनी केली. परंतु पवारांनी ती धुडकावून लावली. मग त्यांच्या दौऱ्याचा ‘फार्स’ कशासाठी? पाणी सोडणार नसाल तर हा सरळ सरळ दुष्काळग्रस्तांवर  अन्याय आहे. पुण्यातील पाणी वाचवून स्वत:च्या भागीदारीतील उद्योगधंद्यांना देणार आहात काय, असाही परखड सवाल त्यांनी केला.

Story img Loader