केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सोलापूरच्या शरद प्रतिष्ठानच्या वतीने दिले जाणारे शरद पुरस्कार यंदा संघर्षमय व प्रतिकूल परिस्थितीवर मात करून कार्यकर्तृत्व गाजविलेल्या सात महिलांना जाहीर झाला आहे. येत्या शुक्रवार, १४ डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता हुतात्मा स्मृतिमंदिरात माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा होणार असल्याची माहिती शरद प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष महेश गादेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शहीद मोहसीन शेख यांच्या मातु:श्री बिस्मिल्लाबी शेख, माजी महापौर मनोहर सपाटे यांच्या मातु:श्री गंगूबाई गणपत सपाटे, शांताबाई मुंडे, अनसूयाबाई बोगम, शांताबाई कोल्हापुरे, शांताबाई कोकाटे व अनिता बुरकुले अशी शरद पुरस्कार मानकऱ्यांची नावे आहेत. या पुरस्कार वितरण सोहळ्याचे अध्यक्षस्थान माजी आमदार जगन्नाथ शेवाळे हे भूषविणार असून यावेळी उपमहापौर हारून सय्यद हे उपस्थित राहणार आहेत.
यंदा शरद पवार यांच्या वाढदिवसाची तारीख १२-१२-१२ अशी आहे. तसेच त्यांच्या मातु:श्री शारदाबाई पवार व यशवंतराव चव्हाण यांची जन्मशताब्दी असा अनोखा संगम साधून संघर्षमय जीवन जगून प्रतिकूल परिस्थिीवर मात करणाऱ्या महिलांना सन्मानित केले जाणार आहे. यंदाच्या पुरस्काराचे पंधरावे वर्ष असल्याचे गादेकर यांनी नमूद केले. यावेळी गायक कलावंत दीपक कलढोणे व त्यांचे सहकारी ‘माझी बहिणाबाई’ हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पुरस्कार मानक ऱ्यांपैकी बिस्मिल्लाबी शेख या वीरमाता असून त्यांचा मुलगा मोहसीन शेख हा भारतीय सैन्यदलात जवान म्हणून कार्यरत असताना काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत त्यास वीरमरण आले. बिस्मिल्लाबी शेख यांनी आपल्या शहीद जवान मुलाला शालेय जीवनापासून घडविले होते. तिला आपल्या शहीद मुलाचा सार्थ अभिमान वाटतो. पुरस्काराच्या दुसऱ्या मानकरी गंगूबाई सपाटे या माजी महापौर मनोहर सपाटे यांच्या मातु:श्री आहेत. पती गणपत सपाटे हे कापडगिरणी कामगार होते. त्यांच्या तुटपुंज्या उत्पन्नावर संसार चालत नसल्यामुळे कुटुंबीयांसाठी मोलमजुरी करणे गंगूबाईंच्या नशिबी आले. शेण, लाकडे गोळा करणे, गवंडय़ाच्या हाताखाली बांधकामावर मजूर म्हणून गंगूबाई काम करीत होत्या. त्यांनी नंतर भाजी मंडईमध्ये भाजीपाला विकण्याचा व्यवसाय केला. झोपडीत राहून त्यांनी कठोर परिश्रमातून मुलांना घडविले. त्यातूनच मुले मोठी झाली व कर्तबगार निघाली. पुरस्काराच्या तिसऱ्या मानकरी शांताबाई मुंडे या जिल्हा परिषदेत परिचर म्हणून सेवेत आहेत. त्यांचे पती गहिनीनाथ जायभाये हे वालचंद महाविद्यालयात अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते. १९८४ साली त्यांचा अपघाती मृत्यू झाला आणि शांताबाईंचे छत्रच हरपले. त्यावेळी मोठा मुलगा अमित दोन वर्षांचा तर लहान मुलगी सिध्दव्वा ही केवळ तीन महिन्यांची होती. यातच दिराची दोन मुलेदेखील शिक्षणासाठी शांताबाईंकडेच होती. हालअपेष्टा व आर्थिक विवंचनेने ग्रासलेले असताना शांताबाईंनी आपल्या मुलांना अथक परिश्रमातून शिक्षण दिले. मुलगा अमित हा अभियंता (इन्स्ट्रुमेंटल) असून तो सध्या मेक्सिको येथे एका कंपनीत कार्यरत आहे. तर मुलगी सिध्दव्वा ही एमएससी कृषी पदवीधर असून पोलीस फौजदार आहे. पुतण्या मॅकॅनिकल अभियंता तर पुतणी एमबीबीएस डॉक्टर असून सध्या मुंबईत जे. जे. रुग्णालयात पीजीचे शिक्षण घेत आहे. शांताबाइर्ंनी सामाजिक जाणिवेतून विशाल वाघमोडे या तीन वर्षांच्या मुलास शिक्षणासाठी दत्तक घेतल आहे. अनसूया बोगम, शांताबाई कोल्हापुरे, शांताबाई कोकाटे व अनता बुरकुले यांची जीवनगाथाही संघर्षमय आहे.