अवैध प्रवासी वाहतुकीमुळे रिक्षाचा प्रवास धोकादायक होऊ नये यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी शहरात विशेष मोहीम हाती घेतली असून रिक्षाच्या पुढील बाजूस चालकाच्या शेजारी बसून केला जाणारा प्रवास अवैध ठरणार आहे. ठाणे परिवहन प्रादेशिक विभागाने शेअर रिक्षासाठी मागील बाजूस तीन प्रवाशांची ने-आण करण्यास यापूर्वीच हिरवा कंदील दाखविला आहे. असे असताना मागील बाजूस चार आणि चालकाच्या बाजूस एक असा पाच प्रवाशांचा प्रवास अगदी बिनदिक्कत सुरू होता. काही काही रिक्षात तर चालकासह कमीत कमी सहा-सात जणांचा प्रवास होत असल्याने ही कोंबाकोंबी धोकादायक ठरली होती. मात्र वाहतूक पोलीस त्याकडे सोयीस्करित्या दुर्लक्ष करत असत. अखेर चालकाच्या शेजारी बसून सुरू असणाऱ्या प्रवाशी वाहतुकीविरोधात वाहतूक पोलिसांनी जोरदार मोहीम हाती घेतली असून यामुळे ही पुढची सीट बाद ठरली आहे.
ठाणे महापालिकेचा परिवहन उपक्रम ठाणेकरांना समाधानकारक सेवा पुरविण्यात अपयशी ठरत असल्याने ठाणेकरांना दळणवळणासाठी वेगवेगळ्या पर्यायांचा वापर करावा लागतो. घोडबंदर मार्गापासून रेल्वे स्थानकाच्या दिशेने सोडण्यात येणाऱ्या खासगी बसेसचा धंदाही टीएमटीच्या या नाकर्तेपणामुळे जोरात सुरू असून या बसेसवर कारवाई करू नये, यासाठी प्रवाशांकडूनच दबाव वाढत असतो, असा अधिकाऱ्यांचा अनुभव आहे. शेअर रिक्षांना मिळत असलेला प्रवाशांचा प्रतिसादही याच नाकार्तेपणाचा परिपाक मानला जातो.
ठाणे शहरातील ठाणे स्थानक, कोपरी, किसननगर, लोकमान्यनगर, वसंतविहार, कापूरबावडी, मानपाडा, बाळकुम, सिडको, कळवा, मुंब्रा आदी परिसरातून मोठय़ा प्रमाणात अवैध रिक्षा वाहतूक सुरू असते. या रिक्षांमध्ये पाच ते सहा प्रवासी कोंबले जातात. रिक्षा चालकाच्या दोन्ही बाजूस प्रवाशांना बसवून त्यांची वाहतूक केली जाते. दोन्ही बाजूस प्रवासी बसल्यामुळे चालकाला रिक्षा चालविणे शक्य होत नाही. त्यामुळे अपघातही होऊ शकतात. असे असले तरी रिक्षाचालकांकडून शहरात अशा प्रकारची वाहतूक बिनधास्तपणे तसेच खुलेआम सुरू असल्याचे दिसून येते. गेल्या काही वर्षांपूर्वी गोखले रोड परिसरात अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाची बसला धडक बसून मोठा अपघात झाला होता. त्यात काही प्रवाशांना आपला जीवही गमवावा लागला होता. तरीही शहरात अशा प्रकारची धोकादायक वाहतूक सुरूच आहे. या संदर्भात तक्रारी आल्या आहेत. याच पाश्र्वभूमीवर ठाणे वाहतूक पोलिसांनी गेल्या आठवडय़ापासून रिक्षामधून अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या चालकांविरोधात कारवाई सुरू केली आहे. त्यासाठी शहरातील वेगवेगळ्या भागांत वाहतूक पोलिसांचे पथक तैनात करण्यात आले आहे. या कारवाईमुळे अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांचे धाबे दणाणले असले तरी प्रवासी वर्ग हैराण झाल्याचे चित्र आहे.
आठवडाभरात १८०० रिक्षांवर कारवाई
ठाणे वाहतूक पोलिसांनी गेल्या आठवडाभरात अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या १८९३ रिक्षांवर कारवाई केली असून त्याच्यांकडून सुमारे एक लाख ७८ हजार दंड वसूल केला आहे. या कारवाईत मुंब्रा, नौपाडा तसेच ठाणेनगर युनिटने सर्वाधिक कारवाई केली आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. श्रीकांत परोपकारी यांनी दिली. मुंब्रा, कळवा रेल्वे स्थानकाच्या दिशेने अशी वाहतूक मोठय़ा प्रमाणावर होत असल्याचे आढळून आले आहे.
प्रवाशांपुढे नवा पेच..
ठाणे शहरातील अंतर्गत वाहतुकीच्या दृष्टिकोनातून सुविधा देण्यासाठी ठाणे परिवहन उपक्रम सुरू करण्यात आला. गेल्या काही वर्षांत परिवहन सेवेच्या बस गाडय़ा रस्त्यात बंद पडण्याचे प्रमाण वाढू लागल्याने प्रवासी वर्ग हैराण झाला आहे. त्यातूनच प्रवासी वर्ग अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या शेअर रिक्षाकडे वळला असून त्यांना हा प्रवास सोयीस्कर वाटू लागला आहे. रिक्षाही लगेच उपलब्ध होतात आणि वेळेतही घरी पोहोचतो. त्यामुळे शेअर रिक्षांचा पर्याय प्रवाशांसाठी सोयीचा ठरू लागला आहे. असे असताना अवैधपणे सुरू असलेल्या रिक्षांच्या तक्रारी वाढू लागल्याने वाहतूक पोलिसांनी अशा रिक्षांवर कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे रिक्षाचालक अवैध प्रवास वाहतूक म्हणजेच चौथी आणि पाचवी सीट घेण्यास नकार देऊ लागले आहेत. त्यामुळे प्रवास वर्ग हैराण झाला असून त्याच्यापुढे वाहतुकीच्या दृष्टिकोनातून नवा पेच निर्माण झाला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा