शासनाने सरकारी, महापालिका रुग्णालयांमध्ये प्रसूतीसाठी सेवा घेणाऱ्या महिलांना आकारण्यात येणारे सर्व प्रकारचे दर मागील वर्षी रद्द केले आहेत. गर्भवती महिलांना महापालिका, शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत वैद्यकीय सुविधा देण्यात येते. त्याचा परिणाम म्हणून कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रसूतीसाठी वैद्यकीय सुविधा घेणाऱ्या महिलांच्या संख्येत तब्बल तीस टक्क्यांनी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, सेवा घेणाऱ्या महिलांमध्ये केवळ झोपडपट्टी, ग्रामीण भागातील महिला नाहीत, तर मध्यमवर्गीय कुटुंबातील महिलांचाही समावेश आहे, अशी माहिती शास्त्रीनगर रुग्णालयात मानद सेवा देणारे प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अरविंद प्रधान यांनी दिली.
महापालिकेची रुग्णालये म्हणजे बकाल, केवळ झोपडपट्टीतील रुग्णांवर उपचार करणारी अशीच साधारण रुग्णांची मानसिकता नागरिकांची असते. दर्जेदार सुविधा, औषधे या ठिकाणी उपलब्ध असूनही सामान्य, मध्यमवर्गीय घरातील रुग्ण महापालिका रुग्णालयांकडे फारसे फिरकत नाहीत. या पाश्र्वभूमीवर रुग्णालयात मोफत सेवा मिळत असल्याने वेगवेगळ्या स्तरातील महिला शास्त्रीनगर रुग्णालयात उपचारासाठी येत आहेत, असे डॉ. प्रधान यांनी सांगितले. शासनाने गर्भवती महिलांना पालिका रुग्णालयांमध्ये मोफत वैद्यकीय सुविधा देण्याचा आदेश मागील वर्षी काढला. या अध्यादेशाची अंमलबजावणी शास्त्रीनगर रुग्णालयात काटेकोरपणे केली जाते.
मागील वर्षी सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत १६१ गर्भवती महिलांनी शास्त्रीनगर रुग्णालयात प्रसूतीसाठी उपचार घेतले. या वर्षी याच तीन महिन्यांमध्ये २३७ गर्भवती महिलांनी उपचार घेतले. यामध्ये सिझरिन, प्रसूती शस्त्रक्रिया यांचा समावेश आहे. यापूर्वी स्त्रीरोग विभागाच्या बाह्य़ रुग्ण विभागात दररोज उपचारासाठी येणाऱ्या महिलांची संख्या ५० ते ६० असायची. ही संख्या या वर्षी ८० ते १०० झाली आहे. गेल्या दीड महिन्यात ७७ महिलांचे सिझरिन करण्यात आले. ३०० महिलांची नैसर्गिक प्रसूती झाली. ४० दारिद्रय़रेषेखाली महिलांची कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करण्यात आली, असे त्यांनी सांगितले. महापालिका रुग्णालयात यापूर्वी महिलेची साधी प्रसूती झाली तर पाचशे रुपये, सिझरिनसाठी अडीच ते तीन हजार रुपये शुल्क आकारले जायचे. हे शुल्क शासनाने रद्द केल्यामुळे महापालिका रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या महिलांचा ओघ दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक महिलांना खासगी रुग्णालयातील सिझरिनचा सुमारे २० ते २५ हजार रुपये येणारा खर्च परवडत नाही. खासगी डॉक्टर पालिका रुग्णालयात महिलांना शस्त्रक्रियेसाठी पाठवतात, असे डॉ. प्रधान यांनी स्पष्ट केले.