शेकापने लोकसभेच्या निवडणुकीच्या ऐन रणधुमाळीत महायुतीची साथ सोडली तरी पनवेलमध्ये स्थानिक पातळीवरील महायुतीच्या निवडणुकांमध्ये शेकापचे स्थानिक पदाधिकारी महायुतीच्या शिलेदारांचे गुणगाण गाताना दिसतात. रविवारी चिपळे ग्रामपंचायतीच्या यशासाठी शेकापचे सहचिटणीस पंढरी फडके यांनी शिवसेना, भाजपा आणि आरपीआय या राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या मार्गदर्शनामुळे हे यश शेकापला मिळाल्याची कबुली दिल्याने शेकापचे वरिष्ठ नेते मत एकीकडे आणि कार्यकर्त्यांचा उत्साही बाणा एकीकडे असे प्रकार समोर येत आहेत.

लोकसभेच्या निवडणुकीचे बिगूल वाजल्यानंतर शेकापने शिवसेना महायुतीशी काडीमोड घेतला. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत सत्ता ताब्यात ठेवण्यासाठी पनवेलमध्ये याच महायुतीचे मागदर्शन स्वीकारायची दुहेरी भूमिका शेकापने घेतल्याचे फडके यांच्या विधानामुळे दिसून आले आहे. याबाबत आमदार विवेक पाटील म्हणाले की, सहा महिन्यांपूर्वी महायुतीमध्ये असताना चिपळे ग्रामपंचायतीच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी ही युती केल्याने फडके यांनी हे विधान केले असल्याचे स्पष्ट केले आहे.
पनवेलच्या कर्नाळा, चिपळे, कुंडेवहाळ या ग्रामपंचायतींवर शेकापला सत्ता राखण्यात यश आले आहे. कर्नाळा ग्रामपंचायतीमध्ये १३ पैकी ११ जागांवर विजय संपादन केला. कुंडेवहाळ ग्रामपंचायतीमध्ये सर्व ९ जागा ताब्यात घेत काँग्रेसला धूळ चारण्याचे काम शेकापने केले. चिपळे ग्रामपंचायतीमध्ये शेकापचे ६ सदस्य निवडून आले. या ग्रामपंचायतीवर या अगोदर काँग्रेसची सत्ता होती. आता काँग्रेसचे ५ सदस्य निवडून आले आहेत.

Story img Loader