सिंचन क्षेत्रातील भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी एसआयटी, शेतमालाला किफायतशीर भाव व आर्थिक मदत आणि इतर मागण्यांसाठी १९ डिसेंबरला भारतीय शेतकरी कामगार पक्षातर्फे विधानभवनावर मोर्चा नेला जाणार असल्याचे पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
राज्यातील भीषण दुष्काळ, पाण्याची व चाऱ्याची गंभीर समस्या, ऐन सुगीच्या हंगामात शेतमालाचे भाव पाडून शेतकऱ्यांची बाजारपेठेत होत असलेली लूट, महागाई, भ्रष्टाचार व बेरोजगारी यामुळे सर्वसामान्य जनता होरपळली जात आहे. सर्वच पातळीवर भ्रष्टाचाराने बरबटलेले काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार जनतेचे प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरले आहे. सिंचन क्षेत्रात भ्रष्टाचार करण्यात आला असून याप्रकरणी विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) चौकशी होणे गरजेचे आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी चाललेल्या आंदोलक शेतकऱ्यांवर बेछूट गोळीबार होऊन दोन शेतकरी ठार झाले. त्यामुळे शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या मनात असंतोषाचा उद्रेक झाला आहे. याबाबत शासन बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला.
ऊस, कापूस, सोयाबीन, तूर, हरभरा, भात आदी शेतमालाला संपूर्ण उत्पादन खर्चासह किफायतशीर भावाची हमी मिळायला हवी. शेतकरी- शेतमजुरांचे काबाडकष्ट राष्ट्रीय सेवा मानून सर्वाना जाचक अटींशिवाय वृद्धापकाळाची पेंशन योजना सुरू करायला हवी. दुष्काळग्रस्त भागातील प्रामुख्याने मराठवाडय़ातील हक्काच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी त्वरित निर्णय झाला पाहिजे. संत्री, मोसंबी, द्राक्षा, डाळींब, आंबा, केळी आदी फळबागांच्या नुकसान भरपाईसाठी खास पुनर्वसन योजना राबवा, दुष्काळग्रस्त भागातील अपुरे सिंचन प्रकल्प पूर्ण करा, विदर्भात खारपाण पट्टा निर्मूलन महामंडळाची स्थापना, चोवीस तास वीज, काटोल येथे संत्री प्रक्रिया उद्योग सुरू व्हावा आदी अनेक मागण्यांसाठी १९ डिसेंबरला विधान भवनावर मोर्चा नेला जाणार
आहे. पटवर्धन मैदानापासून दुपारी १ वाजता मोर्चा निघेल. तीस हजर लोक यात सहभागी होतील, असे जयंत पाटील यांनी सांगितले. मिनाक्षी पाटील, धैर्यशील पाटील, विवेक पाटील, राहुल देशमुख आदी उपस्थित होते.