काँग्रेस कार्यकर्त्यांनी जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांच्या प्रतीकात्मक पुतळय़ाचे दहन केल्याच्या घटनेचा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार यांनी निषेध केला आहे. काँग्रेसकडून पुन्हा राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना लक्ष्य करण्याचा प्रकार घडल्यास पक्षाचे कार्यकर्ते अधिक आक्रमकपणे त्याला प्रत्युत्तर देतील, असा इशाराही शेलार यांनी दिला.
जायकवाडी धरणासाठी निळवंडे धरणातून सोडलेले पाणी ओझर बंधाऱ्यावर रोखून धरत ते कालव्यातून सोडण्याचे आंदोलन काल पद्मश्री विखे पाटील कारखान्याचे अध्यक्ष डॉ. भास्करराव खर्डे, उपाध्यक्ष रामभाऊ भुसाळ व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केले. या वेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे मंत्री तटकरे यांच्या प्रतीकात्मक पुतळय़ाचेही दहन केले. या आंदोलनाला शेलार यांनी आज पत्रकार परिषदेत प्रत्युत्तर दिले.
शेलार म्हणाले, की जायकवाडी धरणात पाणी सोडण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा झालीच असणार, हा निर्णय राज्य सरकारचा आहे, त्यात काँग्रेसचे मंत्रीही सहभागी आहेत, मंत्रिमंडळाने सामूहिकपणे हा निर्णय घेतला. परंतु तरीही केवळ काँग्रेसकडून राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना टार्गेट केले जात आहे. ज्या काँग्रेसच्या मंत्र्यांचे नेतृत्व मान्य करणाऱ्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले त्यांचा पाणीप्रश्न पेटवण्याचाच हा प्रयत्न आहे. जायकवाडीत पाणी सोडण्याचा निर्णय झाला त्याबाबत काँग्रेसचे पदाधिकारी मुख्यमंत्र्यांनाही भेटले होते, तरीही काँग्रेसकडून दुर्दैवाने आंदोलन केले जात आहे, हे प्रकार त्यांनी थांबवावेत अन्यथा राष्ट्रवादीही त्याला अधिक आक्रमकपणे उत्तर देईल.
जायकवाडीच्या पाणीप्रश्नावर जिल्हय़ातील राष्ट्रवादीच्या नेत्यांची शुक्रवारी नगरमध्ये बैठक आयोजित करण्याचा प्रयत्न असल्याचेही शेलार यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा