पनवेल व उरण विधानसभेची आमदारकी गमावल्यावर पक्ष विस्ताराच्या नावाखाली नवी मुंबईमध्ये सत्ता मिळविण्यासाठी बंडखोरांना उमेदवारी देऊन स्वत:चे राजकीय नशीब आजमावणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाला नवी मुंबईकरांनी महानगरपालिकेच्या निवडणुकीत साफ नाकारल्याने शेकापचे पक्ष विस्ताराचे स्वप्न धुळीस मिळाले आहे. मागील महिन्याभरात दिवस-रात्र एक करून नवीन कार्यकर्त्यांची फळी जमवली, उमेदवारी जाहीर केली, मतदारांना विकासाची स्वप्ने दाखविली तरीही शेकाप हा सामान्य नवी मुंबईकरांना आपला वाटला नाही. त्यामुळे नवी मुंबईत शेकापला आपले खाते उघडता आले नाही.   
शेतकरी कामगार पक्षाने लोकसभा निवडणुकीच्या वेळी शिवसेनेशी शिवबंधन तोडून पक्ष विस्ताराचे धोरण अवलंबले. रत्नागिरी, रायगड, मावळ या ठिकाणची खासदारकी लढविली. परंतु हा निर्णय शेकापच्या भवितव्याला भारी पडला. लोकसभेचे युतीचे सदस्यपद गेले आणि त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीतील सेनेची हक्काची पदरात पडणारी मते याच निर्णयामुळे शेकापला मिळवता आली नाहीत. शेकापचे जयंत पाटील यांचा हा दुर्दैवी निर्णयाचा फटका मोठय़ा प्रमाणात विवेक पाटील व बाळाराम पाटील यांना  बसला. त्यानंतर विवेक पाटील व जयंत पाटील यांनी पक्षाला कॉस्मोपॉलीटीन चेहरा देण्याच्या नावाखाली नवी मुंबईमध्ये होणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीत पक्षाचे नशीब पडताळणीसाठी बांधणी सुरू केली.
 इतर राजकीय पक्षांतून बंडखोरी करणाऱ्याला शेकापने उमेदवारी देण्याचा झपाटा लावला. भरत जाधव आणि त्यांच्या पत्नी हे त्यापैकी एक होत्या. शेकापने नवी मुंबईमध्ये पक्षबांधणी करण्यासाठी तथाकथित रायगड जिल्ह्य़ाच्या पदाधिकाऱ्यालाही हाताशी धरले. याच पदाधिकाऱ्याने पक्ष बळकटीसाठी मोठय़ा प्रमाणात शहराने ओवाळलेल्या मंडळींना शेकापकडे आकर्षित केले. जेथे उमेदवार तेथे पक्ष कार्यालय उघडण्याचा एकच धडाका सुरू झाला. पक्ष कार्यालय उद्घाटनाचे छायाचित्र स्थानिक वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्यासाठी जबाबदारी देण्यात आली. त्यामुळे शेकापने स्वत:च्या पक्षाची हवा परिसरात निर्माण केल्याचा याच पक्षातील नेतेमंडळींचा भास होता. मात्र ज्या तथाकथित पदाधिकाऱ्याला नवी मुंबईत पक्षबांधणीची जबाबदारी दिली होती त्या संबंधित पदाधिकाऱ्याच्या नावावर विविध पोलीस ठाण्यात हत्या, हत्येचा कट, चोऱ्या असे एकूण २२ गुन्हे दाखल आहेत. त्यामुळेच शेकापचा पक्षबांधणीचा संदेश सामान्य नवी मुंबईकरांपर्यंत पोहचू शकला नाही. हा संदेश कामचलावू कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचला अशी चर्चा शेकापच्या गटात सुरू आहे.
मूळचा पनवेलचा असलेल्या शेकापकडे पनवेलची पंचायत समिती व रायगड जिल्हा परिषद आणि पनवेल नगर परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदही शेकापने राखले आहे. तरीही सामान्य पनवेलकर आजही शेकापच्या व्यासपीठावरून विकासाच्या गप्पा ऐकतोय, नगर परिषदेच्या कारभारात सत्तारूढ व विरोधी पक्ष हे ‘हम सब साथ साथ’ अशीच आगळीवेगळी युती कोणत्याही विकासाच्या निविदेच्या निर्णयावेळी पाहायला मिळते. पनवेल नगर परिषदेमधील सत्तारूढांना जनविरोधी निर्णय घेताना विरोधी बाकावरील शेकापच्या सदस्यांनी रोखून एक वेगळा आदर्श दाखवून दिला असता तर नवी मुंबईकरांनी या शेतकऱ्यांच्या नावाच्या पक्षाला स्वीकारलेही असते, परंतु असे कोणतेच निर्णय शेकापच्या नेत्यांनी न घेतल्याने याबाबत कधी व्यासपीठावर चर्चा झाली नाही. त्यामुळे नवी मुंबईतील गुरुवारचा शेकापचा भोपळा हा राजकीय वर्तुळात सर्वानाच अपेक्षित होता. नवी मुंबईकरांना यावेळी सत्तारूढांविरोधात पर्याय हवा आहे असे गृहीत धरून शेकापने आपला आंदोलनी बाणा दाखवून सामान्यांपर्यंत भेटी घेतल्या पण तोपर्यंत वेळ हातची निघून गेली होती.

सामान्य पनवेलकरांची शेकापकडून अपेक्षा
१) पनवेलच्या तीनआसनी रिक्षा मिटरप्रमाणे धावण्यासाठी प्रवाशांच्या बाजूने शेकापने ठामपणे उभे राहावे. असे झाल्यास ४० रुपयांचा प्रवास पाच रुपयांत सामान्यांना करता येईल.
२) शेकापने पनवेलमध्ये तीनआसनी व सहाआसनी रिक्षाचालकांच्या बाजूने आपली भूमिका घेतल्याने तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये आजही नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमाची बससेवा सुरू होऊ शकली नाही. ती सुरूहोण्यासाठी प्रयत्न करावेत. तसे झाल्यास ५० हजार कामगार सुखावतील.
३)  काही स्थानिक मंडळींनी संघटना स्थापन करून दुधावरचा आणि नारळपाण्यावरील जिझीया कराची प्रथा सिडको वसाहतींमध्ये सुरू     केली आहे. शेकापने ही बेकायदा प्रथा बंद करून आपण शहरवासीयांच्या पाठीशी उभे आहोत हे दाखवून द्यावे.  
४) एनएमएमटीची बससेवा रेल्वेस्थानक ते शहर ही पाच मिनिटांनी असावी, अशी प्रवाशांची मागणी आहे. मात्र स्थानिक तीनआसनी रिक्षाचालकांची अध्र्या तासांच्या विलंबाने बस चालवावी, अशी भूमिका असल्याने सामान्य प्रवाशांना अजूनही     बससाठी रांगेत उभे राहावे लागते. हीच बससेवा     दहा मिनिटांनी सुरू व्हावी यासाठी प्रयत्न करावेत.  

Story img Loader