शिवसेनेपासून काडीमोड घेतलेल्या शेकापचे कार्यकर्ते सध्या संभ्रमावस्थेत आहेत. एरवी लालबावटय़ाच्या सोबत महायुतीतील इतर झेंडे खांद्यावर घेणाऱ्या कार्यकर्त्यांला कोणता झेंडा घेऊ हाती हा प्रश्न पडला आहे. कार्यकर्त्यांचा हा संभ्रम दूर करण्यासाठी शेकापने बुधवारी सायंकाळी कर्नाळा स्पोर्ट्स अ‍ॅकेडमीमध्ये कार्यकर्त्यांची बैठक घेतली. एका जिल्ह्य़ापुरता असणारा शेतकरी कामगार पक्षाच्या कक्षा रुंदावण्यासाठी महायुतीमधून बाहेर पडल्याची भूमिका नेत्यांनी या वेळी मांडली. शेकापचे दोन खासदार आणि सात आमदार निवडून आणण्यासाठी हा निर्धार या वेळी आमदार विवेक पाटील यांनी जाहीर केला आहे. शेतकरी कामगार पक्ष पनवेलच्या ग्रामीण परिसरात वाढला. नव्याने होणाऱ्या वसाहतीमध्ये तो अलीकडच्या चार वर्षांत शिरला. शेतकऱ्यांचा पक्ष समजल्या जाणाऱ्या या पक्षाची ताकद पक्षाचा सामान्य कार्यकर्ता हीच राहिली. पक्षप्रमुखाने आदेश द्यायचा आणि आंदोलनासाठी कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरायचे ही पक्षनिष्ठा असलेला कार्यकर्ता हा पक्षाचा कणा राहिला. मात्र लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच शेकापच्या नेत्यांनी काडीमोड घेण्याचा निर्णय जाहीर केला. नेत्यांच्या या निर्णयामुळे शेकापसोबतच सेनेचे कार्यकर्तेसुद्धा बुचकळ्यात पडले होते. यातच नेत्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी घेतलेल्या भेटीने यात अधिक भर पडली होती. पक्षाची रणनीती स्पष्ट करण्यासाठी बोलावलेल्या बैठकीत नेत्यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. मुंबई उपनगराच्या काही भागांत, पिंपरी-चिंचवड, रत्नागिरी आणि नवी मुंबई अशा शहरांमध्ये भविष्यात शेकापचा विस्तार करायचे असल्याचे या वेळी आमदार पाटील यांनी सांगितले. आमदार जयंत पाटील आणि आपल्यात कोणताही वाद नसल्याचे या वेळी आमदार पाटील यांनी स्पष्ट केले. शेकापने वेळोवेळी महायुतीच्या जाहीरसभेसाठी अनेकदा प्रयत्न करूनही शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी प्रतिसाद न दिल्यामुळे महायुती दुभंग पावल्याचे आमदार पाटील यांनी या वेळी सांगितले. या वेळी बाळाराम पाटील यांनी कार्यकर्त्यांना समयसूचकतेचा इशारा देत शिवसेनेवर तोंडसुख घेण्याचे टाळा, असे आदेश दिले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा