आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातील लोकशाही आघाडीला शह देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना महायुतीमध्ये दाखल झाली असली तरी विदर्भातील शेतकरी संघटनेने मात्र आपले पत्ते उघड केले नाहीत. अमरावती जिल्ह्य़ात पुसदा येथे १३ व १४ जानेवारीला आयोजित संघटनेच्या बैठकीत महायुतीमध्ये जायचे की नाही, या संदर्भात निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. शेतकरी संघटना दाखल झाली तर राज्यासह विदर्भात महायुती अधिक बळकट होईल आणि काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
आगामी लोकसभा आणि त्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुका बघता खासदार राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना महायुतीमध्ये दाखल झाल्यानंतर शेतकरी संघटना महायुतीमध्ये येणार की नाही याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली असली तरी संघटनेने मात्र अजूनपर्यंत आपली भूमिका स्पष्ट केली नाही. या संदर्भात शेतकरी संघटनेचे नेते आणि प्रवक्ते राम नेवले यांच्याशी संपर्क साधला त्यांनी सांगितले, राज्यासह विदर्भातील विविध जिल्ह्य़ात शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटना कार्यरत असून मोठय़ा प्रमाणात शेतकरी आणि शेतमजूर या संघटनेशी जुळलेले आहेत. विदर्भात शेतकरी संघटनेने अनेक आंदोलने केली आहेत. शेतकरी संघटना ही कुठल्याही राजकीय पक्षामध्ये नसून तिचे स्वतंत्र अस्तित्व आहे. राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना वेगळी असून त्याचा शेतकरी संघटनेशी काही संबंध नाही. शेतकरी संघटनेचे विदर्भासह राज्यातील विविध भागात सदस्य आहेत. शेतकऱ्यांचे कुठलेही आंदोलन असले की दोन्ही संघटना एकत्रपणे आंदोलन करीत असल्या तरी दोन्ही संघटनांची ध्येय व धोरणे वेगळी आहेत. आज विदर्भात मोठय़ा प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असताना आणि शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नसताना शेतकरी संघटना त्यांच्यासाठी काम करीत आहे. स्वाभिमानी संघटनेचा महायुतीमध्ये समावेश झाला असला तरी शेतकरी संघटना मात्र कुठल्याही राजकीय पक्षात नाही आणि तसा कुठलाही निर्णय घेण्यात आला नाही.
अमरावती जिल्ह्य़ात पुसदा येथे शरद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली १३ व १४ जानेवारीला संघटनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होणार आहे. त्या बैठकीत राजकीय चर्चा होण्याची शक्यता आहे. महायुती किंवा काँग्रेससोबत जायचे की स्वतंत्र राहायचे हा निर्णय बैठकीत घेतला जाणार आहे. शेतकरी संघटना लोकसभा निवडणूक लढवणार की नाही हा निर्णय बैठकीत घेतला जाण्याची शक्यता आहे, असेही राम नेवले यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा