महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यात मागेल त्याला शेततळे ही योजना राबविण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री सुरेश धस यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या कामांचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी धस बोलत होते. जिल्हाधिकारी एस. पी. सिंह, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी, जिल्हा नियोजन अधिकारी ना. गो. पतंगे आदी अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यात सिंचनाचे प्रमाण वाढावे, या साठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. लाभक्षेत्राची अट शिथील करण्याचा विचार असून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोहयोखाली शेतकऱ्यांना मागेल त्याला शेततळे देण्यात येईल. जिल्ह्यात रेशीम उद्योगवाढीसाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोहयोअंतर्गत अनुदान देण्याचा विचार असल्याचेही धस यांनी सांगितले. परभणीसह बीडमध्येही ही योजना राबविली जाईल. या संदर्भातील शासन निर्णय लवकरच निघणार असल्याचे ते म्हणाले. २६ जानेवारीच्या ग्रामसभेत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोहयोअंतर्गत रेशीम उद्योगाबाबतचा आराखडा तयार करावा, अशा सूचना त्यांनी दिल्या. उपविभागीय अधिकारी सुनील यादव, एस. एस. मावची, ब्रिजेश पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष वेणीकर, कार्यकारी अभियंता आर. एन. पटवेकर आदी उपस्थित होते.

Story img Loader