नवी मुंबईतील क्वीन निकलेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पामबीच मार्गावरील पालिकेच्या आलिशान मुख्यालयात गुरुवार १० एप्रिल रोजी कारभाराचे सीमोल्लंघन होणार आहे. उद्घाटनानंतर तब्बल दीड महिन्यानंतर हे स्थलांतर होत असून १२ एप्रिलपासून तीन दिवस मिळणाऱ्या सुट्टी काळात जुन्या मुख्यालयातील सर्व संगणक व त्यांचे सव्र्हर हलविले जाणार आहेत. परदेशातून येणाऱ्या खुच्र्या आणि अनेक जुजबी कामे शिल्लक राहिल्याने हे स्थलांतर लांबणीवर पडले होते मात्र आता त्याला अखेर मुहूर्त लाभला असून १५ एप्रिलपासून या मुख्यालयातील दैनंदिन कारभार खऱ्या अर्थाने सुरू होणार आहे. नवी मुंबई पालिकेने १७० कोटी रुपये खर्च करून पामबीच मार्गावर बेलापूर सेक्टर ५० अ येथे अडीच एकर जमिनीवर पाच मजल्याचे आलिशान मुख्यालय उभारले आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी १८ फेब्रुवारी रोजी या मुख्यालयाचे उद्घाटन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते आटोपून घेण्यात आले होते. त्यानंतर स्थापत्य व फर्निचरची अनेक कामे पूर्ण न झाल्याने हे स्थलांतर रखडले होते. त्यात सरतेशेवटी खुच्र्याचा प्रश्न निर्माण झाला होता. या कार्यालयातील सर्व प्रमुख पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या खुच्र्या या परदेशातून मागविण्यात आल्या आहेत, पण फर्निचर कंत्राटदाराला अगोदरचे बिल न मिळाल्याने त्या काही दिवस बंदरात पडून होत्या, पण आता या खुच्र्या आल्या आहेत. आलिशान फर्निचरचे हे काम शाहपूरजी पालमजी यांनी केलेले आहे. कंत्राटदाराला हे काम करण्यासाठी मेपर्यंतची मुदत हवी होती, पण उद्घाटनाचा बार लवकर उडवायचा असल्याने उद्घाटन झाल्यानंतरही इमारतीतील स्थापत्य कामे सुरू होती. ती अखेर पूर्ण झाल्याने १० एप्रिलपासून जुन्या मुख्यालयातील दस्तावेज आवरण्याचे आदेश आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांनी दिले आहेत. त्यामुळे १० एप्रिल पासून नवी मुंबई पालिकेचा कारभार नवीन मुख्यालयातून सुरू होणार आहे. त्यानंतर १२ ते १४ हे तीन दिवस पालिकेला सार्वजनिक सुट्टी असल्याने या काळात संगणकाची कामे केली जाणार असल्याचे उपायुक्त जगन्नाथ सिन्नरकर यांनी सांगितले. भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १४ एप्रिल रोजी जयंती आहे. मुख्यालयात साजरी होणारी राष्ट्रपुरुषाची ही पहिली जयंती ठरणार आहे. त्यामुळे दलित समाज या निमित्ताने नवीन मुख्यालय बघण्यासाठी व डॉ. आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येणार आहे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा