कल्याण-शिळफाटा रस्ता पुन्हा एकदा वाहतूक कोंडीच्या जंजाळात सापडला असून याठिकाणी उडणाऱ्या धुळीच्या लोटामुळे प्रवाशी अक्षरश हैराण झाले आहेत. कल्याणमधील पत्रीपुलाकडून येणारी आणि शिळफाटय़ाकडून जाणारी वाहने या कोंडीत सोमवारी अडकून पडली होती.  सोमवारी सायंकाळी सहा ते रात्री अकरा वाजेपर्यंत कल्याण शिळफाटा रस्त्याला हा वाहतुकीचा विळखा पडला होता. या रस्त्यावर कोठेही अपघात झाला नव्हता. त्यामुळे या वाहतूक कोंडीमुळे चालक चक्रावून गेले होते. शिळफाटय़ाकडून येणारी वाहने डाव्या बाजुने कल्याणकडे येत होती. ही वाहने डाव्या बाजुला वाढल्याने दुसऱ्या दिशेने जाणाऱ्या वाहन चालकांनी शिळफाटय़ाकडून आपली वाहने रस्त्याच्या उजव्या बाजुकडील वाहनांच्या आगमनाच्या मार्गातून नेण्यास सुरूवात केली. त्यामुळे लोढा हेवनजवळील व निळजे गावाजवळील उड्डाणपुलांवर ही वाहने अडकून पडली. कल्याणकडून येणाऱ्या वाहनांचा रस्ता शिळफाटय़ाकडून येणाऱ्या वाहनांनी रोखून धरला. त्यामुळे वाहने निघण्यास कोठेच जागा नव्हती. रस्त्याच्या मध्यभागी दुभाजक असल्याने वाहने फिरविण्यास जागा नव्हती. दोन्ही बाजुकडील वाहने अडकून पडल्याने कल्याण दिशेला भिवंडी वळण रस्त्यापर्यंत वाहने रांगेत होती. शिळफाटा दिशेला महापे, पनवेल वजनकाटा, मुंब्रा भागात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. कल्याणमधील शिवाजी चौक, सहजानंद चौक, लाल चौकी भागातील रस्ते वाहतूक कोंडीने जॅम झाल्याने शहरांतर्गत वाहतूक ठप्प झाली होती. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने या मार्गावर अशाचप्रकारे वाहतूक कोंडी पहावयास मिळत आहे.
धुळीचे लोट
संध्याकाळी सात वाजल्यापासून कोंडीत अडकलेले प्रवासी अखेर पायी प्रवास करीत आपले इच्छित स्थळी गाठत होते. धूळ, प्रदूषणाचे लोट या भागातून वाहत होते. सोमवारी लग्नाचा हंगाम असल्याने वऱ्हाडी या कोंडीत अडकून पडले होते. चाकरमान्यांची वाहने रखडली होती. जागरूक चालक, पोलिस, नागरिकांनी पुढाकार घेऊन ही कोंडी सोडविण्याचा प्रयत्न केला. निळजे गावाजवळील टोल नाक्यावर टोल स्वीकारण्यासाठी कल्याण दिशेने येणाऱ्या वाहनांसाठी तीन मार्गिका व शिळफाटय़ाकडे जाणाऱ्या वाहनांसाठी तीन मार्गिका आहेत. दोन्ही बाजुकडील रस्त्याकडील मार्गिका दुचाकी वाहने, टोलमुक्त वाहनांसाठी आहेत. दोन मार्गिकामध्ये टोल घेण्यावरून वाहन चालक व कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाला तर गाडी मार्गिकेमध्ये अडवून ठेवली जाते. त्यामुळे पाठीमागे वाहनांचा रांगा लागतात. वाहतूक पोलिस बॅरिकेड लावून टाटा नाका, सोनारपाडा भागात व्यस्त असल्याने त्यांना या गंभीर विषयाकडे लक्ष देण्यास वेळ नसतो.

Story img Loader