ठाणे महापालिकेतील वेगवेगळ्या प्रभागांमधील चार जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत तीन ठिकाणी काँग्रेस, तर एका ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विजय मिळविल्याने महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना-भारतीय जनता पक्षाची डोकेदुखी वाढली असून आघाडी आणि युती या दोन्ही गटांचे संख्याबळ पुन्हा एकदा समसमान झाले आहे. विशेष म्हणजे, भाजपमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत धुसफुसीमुळे शिवसेनेच्या गोटात आधीच अस्वस्थता असताना आघाडीचे संख्याबळ वाढल्याने महापालिकेतील सत्तासंघर्ष आणखी तापण्याची चिन्हे आहेत.
सुमारे दोन हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प असलेल्या ठाणे महापालिकेच्या स्थायी समितीवर दीड वर्षांपूर्वी काँग्रेसच्या रवींद्र फाटक यांनी विजय संपादन करत शिवसेना नेत्यांचे तोंडचे पाणी पळविले होते. लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान पदाला पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरे यांचे मनसेचे सात नगरसेवक ठाणे महापालिकेत काँग्रेस आघाडीच्या कळपात सहभागी झाले आहेत. मनसेच्या पाठिंब्यामुळेच काँग्रेसला स्थायी समितीवर विजय मिळवता आला होता. स्थायी समिती सभापतीपद हातचे गेल्यामुळे वर्षभर महापालिकेतील आर्थिक पकड सैल झाल्यामुळे कातावलेल्या शिवसेना नेत्यांनी वर्षभरापूर्वी झालेल्या निवडणुकीत कळव्यातील राष्ट्रवादीचे नगरसेवक गणेश साळवी यांना गळाला लावत पुन्हा एकदा स्थायी समितीवर वर्चस्व मिळविले होते.
याशिवाय महापौर निवडणुकीत गैरहजर राहल्याचा ठपका ठेवत कोकण आयुक्तांनी काँग्रेस पक्षाच्या मुंब्रा येथील तिघा नगरसेवकांचे पद रद्द केल्याने महापालिकेतील अंतर्गत राजकारणावरील शिवसेनेची पकड अजूनच घट्ट झाली होती.
पोटनिवडणुकीत मात्र धक्के
मुंब्रा आणि कळवा परिसरांतील चार जागांसाठी पोटनिवडणुका जाहीर करण्यात आल्या होत्या. हा संपूर्ण परिसर कल्याण लोकसभा मतदारसंघात मोडत असल्याने स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काँग्रेसपुढे नमते घेत मुंब््रयातील जागेवर उमेदवार उभे करायचे नाहीत, असा निर्णय घेतला होता. त्यामुळे आव्हाड यांचे कट्टर प्रतिस्पर्धी राजन किणे, अमीया कुरेशी हे दोघे नगरसेवक यापूर्वीच बिनविरोध निवडून आले होते. मुंब््रयातील आणखी एका प्रभागात झालेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या रेश्मा पाटील यांनी मोठा विजय संपादन केल्याने महापालिकेतील काँग्रेसचा आकडा पुन्हा एकदा १८ झाला आहे. दरम्यान, कळवा परिसरात झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अक्षय ठाकूर यांनी शिवसेनेचे सचिन म्हात्रे यांचा १९० मतांनी पराभव केल्याने महापालिकेतील आघाडीचे संख्याबळ पुन्हा एकदा ५८ झाले आहे. मनसेच्या सात नगरसेवकांचा आघाडीला तांत्रिक पाठिंबा असल्याने हा आकडा ६५ पर्यंत पोहोचला असून यामुळे सहा महिन्यांवर येऊन ठेपलेल्या महापौर निवडणुकीत शिवसेनेची डोकेदुखी वाढण्याची चिन्हे आहेत. भारतीय जनता पक्षात मिलिंद पाटणकर आणि संजय वाघुले गटातील नगरसेवकांमध्ये टोकाची स्पर्धा सुरू असून या राजकारणामुळे काही नगरसेवक राष्ट्रवादीच्या गळाला लागण्याची चिन्हे आहेत. असे असताना कळवा पोटनिवडणुकीतील पराभवामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. या प्रभागातून यापूर्वी विजयी झालेले गणेश साळवी सध्या शिवसेनेत असून त्यांनी राजीनामा दिल्याने ही निवडणूक घेण्यात आली होती. साळवी यांच्या पक्षबदलू राजकारणाला यामुळे धक्का बसला असून विधानसभा निवडणुकीत राजकीय महत्त्वाकांक्षा बाळगणारे साळवी यांना मतदारांनी एक प्रकारे घरचा रस्ता दाखविल्याची चर्चा रंगली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा