माढा तालुक्यातील विविध गावांमध्ये आधार फाउंडेशनने आयोजिलेल्या रक्तदान सप्ताहात २ हजार २०० बाटल्यांचे रक्तसंकलन झाले. या रक्तदान सप्ताहाचा समारोप टेंभुर्णी येथे पंढरपूरच्या वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे यांच्या अध्यक्षतेखाली व पंढरपूरचे आमदार भारत भालके यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यानिमित्ताने माढा तालुक्यातील राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे यांचे विरोधक एकाच व्यासपीठावर आल्याचे पाहावयास मिळाले.
टेंभुर्णीचे संजय कोकाटे यांनी स्थापन केलेल्या आधार फाउंडेशनने टेंभुर्णीसह मोडनिंब, माढा, कुर्डूवाडी, तसेच महाळुंग आदी भागात रक्तदान सप्ताहाचे आयोजन केले होते. यात सहभागी होऊन रक्तदान केलेल्या व्यक्तींसाठी भाग्य सोडतीद्वारे मोटारसायकल, दूरचित्रवाणी संच, मोबाइल संच आदींचे वाटप करण्यात आले. तसेच प्रत्येकाला संजीवनी आरोग्य कार्डाचेही वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना आमदार भारत भालके यांनी, माढा तालुक्यातील सर्व विरोधकांना एकत्र आणण्यामागचा उद्देश कोणताही असला तरी यात आपण सहकार्य करण्याची ग्वाही दिली. अन्यायाच्या विरोधात नकारात्मक विचार न करता एकमेकांना आधार देण्यासाठी सर्वानी एकत्र यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तर कल्याणराव काळे यांनी, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेप्रमाणेच जिल्हा दूध उत्पादक संघाची अवस्था बिकट असून त्याकडे लक्ष देण्याची गरज प्रतिपादन केली.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश सचिव संजय पाटील-घाटणेकर म्हणाले,की माढा तालुक्यातील साखर कारखान्यांमध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उसाचे वजनकाटा मारून होत असल्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होत असल्याबद्दल संताप व्यक्त केला.  सर्व साखर कारखान्यांवर उसाचे वजन वैधरीत्या होण्यासाठी वजनकाटे बसवावेत. त्यासाठी आधार फौंडेशनच्यावतीने ५० हजारांचा निधी देण्याची तयारी दर्शविली. भारत शिंदे, पंढरपूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश पाटील आदींनी विचार मांडून माढा तालुक्यात सत्ताधाऱ्यांकडून होणारी विरोधकांची मुस्कटदाबी थांबविण्यासाठी सर्वानी एकजूट दाखवावी,असे आवाहन केले. या वेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती संजय पाटील, राजूबापू पाटील, अनिल पाटील, बाळासाहेब ढवळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक भोसले, शिवाजी पाटील, महेश निंबाळकर, मोहन कोळेकर, अॅड. कृष्णात बोबडे, नागेश बोबडे यांच्यासह माढा, पंढरपूर व माळशिरस तालुक्यातील कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन शक्तिप्रदर्शन घडविले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा