महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे घाटकोपर (मुंबई) येथील आमदार राम कदम यांनी त्यांच्या मतदारसंघातील सुमारे १३ हजार भाविकांना आज शिर्डीची मोफत सहल घडवली. कदम यांनी आत्तापर्यंत सुमारे ५१ हजार नागरिकांना शिर्डीची वारी घडवून आणली आहे.
मतदारसंघात धार्मिक वातावरणाची निर्मिती व्हावी, शिर्डीच्या साईदरबारातून कोणीही रिकाम्या हाताने परत जात नसल्याने मतदारांना साईबाबांच्या दरबारात घेऊन आलो. साईंच्या दर्शनाने त्यांचे दु:ख, अडीअडचणी दूर होतील, अशी भावना कदम यांनी व्यक्त केली. सहलीसाठी कोणतीही जाहिरात न करता ४५ हजार मतदारांनी आपल्याकडे नावनोंदणी केली. मात्र एवढय़ा मोठय़ा संख्येने बसची व इतर व्यवस्था करणे शक्य नसल्याने उर्वरित लोकांना टप्प्याटप्प्याने साईदर्शन घडवणार असल्याचे त्यांनी सांगितले. कदम यांच्यासमवेत कैलास बोबडे, मनसे शहरप्रमुख दत्ता कोते, चंद्रकांत मालकर, प्रकाश लगड, अशोक दुधे, विजय पुराणिक आदी होते.
सुमारे ३०० बस व ४० जीपमधून घाटकोपर व विक्रोळी परिसरातील भाविक शिर्डीला आले होते. त्यांची चहा, नाश्ता, बाटलीबंद पाणी, सुकामेवा व एक वेळच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. या भाविकांवर मनसे कार्यकर्त्यांनी पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत केले. कदम यांनी यापूर्वी ३ हजार नागरिकांना काशीयात्रा घडवली होती.

Story img Loader