शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षांसह संचालक मंडळाने राजीनामा द्यावा या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी सुरू केलेले ठिय्या आंदोलन २० व्या दिवशी तात्पुरते स्थगित करण्यात आले. यावेळी अध्यक्ष व्ही. यु. पाटील यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. कारखान्याचे अध्यक्ष पाटील यांच्या घरासमोर १० जानेवारीपासून कर्मचारी व शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले होते. आतापर्यंत मनोहर पाटील, किशोर राजपूत, संजय पटेल आदी १२ संचालकांनी राजीनामे दिले आहेत. उर्वरित संचालक व अध्यक्ष यांचा राजीनामा मिळेपर्यंत ‘पाटील घरी परतल्यावर कामगारांशी संपर्क साधून त्यांनी चर्चा करण्याचा प्रयत्न करावा’ अशा आशयाचा फलक त्यांच्या घरासमोर लावण्याचे आंदोलकांकडून ठरविण्यात आले. जोपर्यंत पाटील व उर्वरित संचालक राजीनामे देणार नाहीत. तोपर्यंत दिसतील तेथे त्यांना घेराव घालून राजीनामे मागितले जातील. पाटील घरी परतल्यावर त्यांना राजीनाम्यासाठी भाग पाडू. शासन दरबारी संचालक मंडळाची तक्रार करून मंडळ बरखास्त करण्यसााठी प्रयत्न केले जातील. एप्रिल २०१४ मध्ये संचालक मंडळाची मुदत संपत आहे. त्यामुळे निवडणूक लवकर घेण्यात यावी, यासाठी वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठविले जातील. यापुढे होणाऱ्या आंदोलनाला शेतकऱ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहनही कामगार संघटनेने केले आहे. यावेळी कारखान्याचे माजी संचालक मनोहर पाटील, प्रसन्न जैन, किरण दलाल, वासुदेव देवरे, बी. एच. पवार आदी उपस्थित होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा