शासनाच्या वतीने महाबळेश्वर तालुक्यातील किल्ले प्रतापगडावर आज शिवप्रतापदिन साजरा झाला. मात्र गेल्या काही वर्षांपर्यंत लोकसहभागाने उत्साहात साजरा होणाऱ्या उत्सवाचे रूप दिवसेंदिवस ‘शासकीय’ होऊ लागल्याने शिवप्रेमींमध्ये नाराजी पसरली आहे.
मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी हा दिवस म्हणजे छत्रपती शिवरायांच्या विजयाचा दिवस. या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझल खानचा वध केला. ही घटना किल्ले प्रतापगडावर घडल्याने दरवर्षी हा दिवस ‘शिवप्रतापदिन’ म्हणून साजरा केला जातो. या वर्षी या सोहळ्याचा प्रारंभ सातारा जिल्ह्य़ाचे जिल्हाधिकारी एन. रामस्वामी यांच्या हस्ते किल्ले प्रतापगडावरील श्री भवानीमातेला अभिषेक, महापूजा व महाआरतीने झाला. या वेळी जिल्हा पोलीस अधीक्षक प्रसन्ना, निवासी जिल्हाधिकारी संजय देशमुख, जि.प. कार्यकारी मुख्याधिकारी अभिजित बांगर, वाई प्रांताधिकारी सूरज वाघमारे, कराड प्रांताधिकारी संजय तेली, तहसीलदार अतुल मेहत्रे, डी.वाय.एस.पी. धस उपस्थित होते.
आरतीच्या वेळी श्री भवानीमातेचे सेवेकरी विजय हवालदार, बाळकृष्ण हडपगुरुजी, श्रीकांत फडणीस, व्यवस्थापक परदेशीकाका, पुजारी शंकर गुरव, गणेश जरे, सुरेश जाधव, नायब तहसीलदार वाय. बी. सापते, अमोल सलागरे, तसेच विविध खात्यांचे वरिष्ठ अधिकारी, शिवभक्त मोठय़ा संख्येने उपस्थित होते. त्यानंतर मंदिरासमोरील प्रांगणात प्रतापगडच्या सरपंच सुशीला कारंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण होऊन छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. या वेळी महाबळेश्वरचे नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर, नगरसेवक संतोष आबा शिंदे उपस्थित होते. पालखीचे भोई होण्याचा मान जिल्हाधिकारी रामस्वामी, पोलीस जिल्हा अधीक्षक प्रसन्ना, नगराध्यक्ष बावळेकर यांना मिळाला होता. या वेळी जावली प्राथमिक शाळेचे विद्यार्थी-विद्यार्थिनी बांबूच्या काठय़ांवर उभे राहून या पालखीत सहभागी झाले होते. तसेच प्रतापगड व परिसरातील शाळांमधून विद्यार्थ्यांचे लेझीम पथक, झांजपथकेही सहभागी झाली होती. पालखी मिरवणुकीची सांगता छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याजवळ झाली. येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते झेंडावंदन झाले. यानंतर शाहीर प्रभाकर आसनगावकर यांचा शिवचरित्रावर पोवाडय़ाचा कार्यक्रम झाला. या वेळी शाहीर विष्णुपंत सोनावणे (खरशी आनेवाडी) यांनी त्यांना साथ केली. यावेळी छत्रपतींच्या पुतळ्यास अभिषेक करण्यात आले. यात भाऊ जंगम व अरुण शिंदे यांचा सहभाग होता.
संपूर्ण गडावर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. मुख्य पुतळा व परिसर फुलांनी सजविला होता. सकाळी हेलिकॉप्टरमधून शिवपुतळय़ावर पुष्पवृष्टी करण्यात आली. पालखी मिरवणुकीमध्ये जावली प्राथमिक शाळेतील मुला-मुलींनी बांबूच्या काठय़ांवर उभे राहून संपूर्ण पालखी मार्गभर आगळ्यावेगळ्या पद्धतीने सहभाग घेतला होता.
उत्सवाचे स्वरूप बदलल्याने नाराजी
किल्ले प्रतापगडावर शिवप्रतापदिनाच्या सोहळ्याचा प्रारंभ राज्यातील असंख्य शिवप्रेमी आणि प्रतापगड उत्सव समितीने केला होता. पुढे हा उत्सव शासनाच्या वतीने साजरा केला जाऊ लागला आहे. पण पूर्वा या उत्सवात हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी, पोलीस पथकाच्या वतीने बंदुकीच्या फैरी झाडून छत्रपती शिवरायांना मानवंदना देण्यात यायची. यानिमित्ताने पोवाडे, वक्तृत्व स्पर्धाचे आयोजन केले जायचे, वीर माता पुरस्कार तसेच अन्य वीरश्री पुरस्कारांचे वितरण व्हायचे, गुणगौरव, विविध शौर्य खेळांची प्रात्यक्षिके सादर व्हायची. या सोहळ्य़ात राज्यभरातील शिवप्रेमींसह स्थानिक प्रतापगड पंचक्रोशीतील शिवभक्त सहभागी व्यायचे. पण पुढे अनेक बंधने आणि उत्सवाला एका उपचारापुरते दिलेल्या शासकीय स्वरूपामुळे उत्सवातील जोशच गायब झाला आहे. केवळ एक उपचारापुरते शासन हा उत्सव साजरे करत असल्याचा आरोप शिवप्रेमींमधून होत आहे.
 

Story img Loader