तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी, काँग्रेस तसेच भाजपची सफाया झाला असून शिवसेना तसेच कम्युनिस्ट पक्षाने मात्र आपापले बालेकिल्ले राखले आहेत. बहुचर्चित कान्हूरपठार ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत जिल्हा परिषदेचे सदस्य आझाद ठुबे यांनी सर्व म्हणजे तेराही जागा जिंकून काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजप युतीला धोबीपछाड देत एकहाती वर्चस्व पुन्हा एकदा सिद्घ केले. वाडेगव्हाणमध्ये पंचायत समितीचे सदस्य गणेश शेळके यांनी ११ पैकी ९ जागा जिंकून शिवसेनेची सत्ता कायम राखली.
पाचही ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी रविवारी मोठय़ा चुरशीने ८६.१० टक्के मतदार झाल्यानंतर आज सकाळी दहा वाजता मतमोजणीस सुरुवात करण्यात आली. यादववाडी, मावळेवाडी, काकणेवाडी, वाडेगव्हाण व कान्हूरपठार या क्रमाने मतमोजणी करण्यात आली. सकाळी नऊपासूनच विविध गावांच्या कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयाच्या आवारात मोठी गर्दी केली होती. कान्हूरपठार ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतील चुरस पाहता सहायक पोलीस निरीक्षक मारुती मुळूक यांनी तहसील कार्यालय परिसरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. एका पाठोपाठ एक ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर झाल्यानंतर विजयी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.
कान्हूरपठार ग्रामपंचायतीच्या निकालाची तालुक्याबरोबरच जिल्ह्य़ातील अनेकांना उत्सुकता होती. खासदार दिलीप गांधी यांनीही तहसील कार्यालयाशी संपर्क साधून कान्हूरपठारच्या निकालाची माहिती घेतली. ही संवेदनशीलता लक्षात घेऊनच प्रशासनाने कान्हूरची मतमोजणी सर्वात शेवटी केली. आझाद ठुबे यांच्या नेतृत्वाखालील बाबासाहेब ठुबे पंचरत्न पॅनेलच्या सर्वच उमेदवारांनी एकतर्फी विजय संपादन केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर मतमोजणीसाठी आलेल्या ठुबे समर्थकांनी तेथेच जल्लोष केला. मतमोजणी केंद्राबाहेरच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी तसेच गुलालाची उधळण करीत आझाद ठुबे यांच्या जयजयकाराच्या घोषणा दिल्या. मतदारांनी आझाद ठुबे यांच्या एकहाती नेतृत्वावर पुन्हा एकदा विश्वास व्यक्त करून सलग चौथ्या निवडणुकीत त्यांच्या हाती सत्ता दिली.
 

Story img Loader