भाजप- शिवसेना- रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) या युतीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सहभागी करून घेण्याबाबत संकेत मिळत असतानाच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी विसंगत विधाने केल्यामुळे विशेषत: सेना व मनसे या पक्षांचे विदर्भातील कार्यकर्ते संभ्रमात आहेत. महायुतीबाबत या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी सावध पवित्रा घेतला असल्याचे आतापर्यंतच्या घडामोडींवरून दिसत आहे.
पुढील वर्षीच्या निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून सेनाप्रमुख उद्धव ठाकरे व मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी राज्याच्या विविध भागांमध्ये सभा घेणे सुरू केले आहे. गेल्या महिन्यात उद्धव ठाकरे यांनी शिवशक्ती-भीमशक्ती युतीत मनसे सहभागी होऊ शकते असे संकेत दिले होते. परंतु राज ठाकरे यांनी अद्याप मनापासून तशी तयारी दर्शवलेली नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी शनिवारी अमरावतीच्या सभेत ‘जे येतील त्यांच्यासोबत आणि न आले तर त्यांच्याशिवाय’, अशा शब्दात आपण महायुतीसाठी मनसेची मनधरणी करणार नसल्याचे संकेत दिले आहेत.
इकडे राज ठाकरे हे वेळप्रसंगी सेना-भाजप युतीतील नेत्यांवर आणि त्यांच्या समर्थकांवर टीका करण्यास मागेपुढे पाहात नाहीयेत. विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांना लक्ष्य केले. त्यापूर्वी त्यांनी भाजप नेते नितीन गडकरी यांचे निकटस्थ असलेले राज्यसभा खासदार अजय संचेती यांचे नाव घेऊन त्यांच्यावर टीका केली होती. असे झाले की मनसे महायुतीत सहभागी होणार असे गृहित धरणाऱ्या कार्यकर्त्यांचा संभ्रम वाढत आहे. राज्यभरातील प्रचार दौऱ्यांचा भाग म्हणून राज ठाकरे यांची येत्या १५ मार्चला अमरावतीत सभा होत आहे. त्यांच्या पक्षाचा सध्या विदर्भात एकही लोकप्रतिनिधी नाही. त्यामुळे ज्या ठिकाणी शिवसेना प्रबळ आहे, त्याच भागात अस्तित्व दाखवून देणे हा त्यांच्या सभेचा उद्देश राहील असा अंदाज आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीतही निवडणुकीच्या तोंडावर वाद निर्माण होण्याचे प्रसंग घडत आहेत. विधानसभेसाठी राकाँ यावेळी गेल्या निवडणुकीपेक्षा जास्त, म्हणजे १४५ जागांची मागणी करेल असे वक्तव्य करून पक्षाचे पुण्यातील नेते वसंत वाणी यांनी नवा वाद निर्माण केला. शरद पवार यांनी त्यावर तातडीने स्पष्टीकरण दिल्यामुळे ते संशयास्पद वाटत आहे. जलसंपदा खात्याबाबतची श्वेतपत्रिका व इतर मुद्यांवर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील मतभेद उघड आहेत. निवडणूक जसजशी जवळ येईल, तसतसे मतभेद, आरोप-प्रत्यारोप आणि उखाळ्यापाखाळ्या यांचे वातावरण अधिकच तापत जाईल असा विरोधकांचा अंदाज आहे. त्यामुळेच, मनसेला सहभागी करून महायुती होत असल्याबद्दल आताच काही स्पष्ट निर्णय घेतला, तर सत्ताधारी आघाडीला सावध होण्यास वेळ मिळेल. तसे होऊ नये म्हणून विशेषत: सेना व मनसे या दोन्ही पक्षांचे नेते या आघाडीला बेसावध ठेवण्यासाठी सावध पवित्रा घेत असल्याचा अंदाज राजकीय क्षेत्रात व्यक्त करण्यात येत आहे.
सेना-मनसेचे विदर्भातील कार्यकर्ते संभ्रमात
भाजप- शिवसेना- रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) या युतीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सहभागी करून घेण्याबाबत संकेत मिळत असतानाच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी विसंगत विधाने केल्यामुळे विशेषत: सेना व मनसे या पक्षांचे विदर्भातील कार्यकर्ते संभ्रमात आहेत.
First published on: 12-03-2013 at 05:09 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena and mns coalition news both party workers are confused