आजीमाजी महापौर आणि गेली अनेक वर्षे नगरसेवक म्हणून मिरवणाऱ्यांना आता विधानसभेची ओढ लागली आहे. परंतु उमेदवारी मिळण्याची शक्यता मावळल्याने शिवसेनेचे काही नगरसेवक बंडाच्या उंबरठय़ावर असून अन्य राजकीय पक्षात प्रवेश करून अथवा अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचा विचार ते करत आहेत. स्वाभाविकच शिवसेनेला या बंडोबांची मोठी डोकेदुखी सहन करावी लागणार आहे. या बंडाचा उद्रेक ऑगस्टमध्ये होण्याची चिन्हे आहेत.
सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात वातावरण असल्याने त्याचा शिवसेनेला मोठा फायदा होईल, असे मानले जाते. त्यामुळे शिवसेनेचे आजीमाजी नगरसेवक, माजी महापौर आणि अनेक शिवसैनिक निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. त्यासाठी या सर्वानी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. परस्परांचे पत्ते कापून आपल्याला अथवा आपल्या समर्थकांना उमेदवारी मिळवून देण्यासाठी अनेकांची धडपड सुरू झाली आहे.
पालिका निवडणुकीत उमेदवारी मिळू न शकलेल्यांची संख्या मोठी होती. त्यावेळी नाराजी दूर करताना विधानसभेत निवडणुकीच्या वेळी विचार करू, अशी लोणकढी थाप मारून काही मध्यस्थांनी वेळ मारून नेली होती. आता त्यावेळची नाराज मंडळीही आपल्यावरील अन्याय दूर करा, अशी मागणी करत आहेत.
अलीकडेच गाजलेल्या शीतल म्हात्रे प्रकरणानंतर त्रास देणाऱ्या नेत्यांविरूद्धही महिला शिवसैनिक आवाज उठवू लागल्या आहेत. उर्मट आणि स्त्रीदाक्षिण्य नसलेल्या नेत्यांना विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात पोहोचण्यापूर्वीच गारद करण्याचे मनसुबे शिवसेनेतील महिलांनी आखले आहेत. परिणामी काही नेत्यांच्या पोटात गोळा उठला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर शिवसेनेत ऑगस्ट महिन्यात प्रचंड उलथापालथ होण्याची चिन्हे आहेत. तिकीट मिळण्याची शक्यता धूसर बनत चालल्याने काही नगरसेवक शिवसेनेचा उंबरठा ओलांडण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यांना केवळ प्रतीक्षा आहे ती उमेदवारी देऊ इच्छिणाऱ्या पक्षाच्या आमंत्रणाची!
झोपु योजनांसाठी विकास नियंत्रण नियमावली ३३ (१०) लागू आहे. समूह पुनर्विकास धोरणात झोपु योजनांचा समावेश करण्याबाबत आपल्यापर्यंत काहीही माहिती आलेली नाही
निर्मल देशमुख,
मुख्य अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन योजना