कल्याणमधील पारनाक्यावरील पोखरण या पाणी साठा करणाऱ्या ऐतिहासिक वास्तूला पर्यटनाचा दर्जा देण्यास शिवसेना-भाजपच्या सदस्यांनी सर्वसाधारण सभेत विरोध केला. पोखरणला पर्यटना दर्जा मिळावा, यासाठी गेल्या काही वर्षांपासून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. मात्र, शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन पक्षांत या मुद्दय़ावरून  सुरू असलेल्या श्रेयाच्या राजकारणामुळे यासंबंधीच्या प्रस्तावाला सर्वसाधारण सभेत विरोध करण्यात आल्याचे वृत्त आहे. पालिकेला विश्वासात न घेता शासन परस्पर पोखरणला पर्यटनाचा दर्जा कसा देते, असा सवाल उपस्थित केला. या भागातील बांधकामांना बाधा पोहोचण्याची भीती व्यक्त करीत शिवसेना सदस्यांनी पोखरण या ऐतिहासिक वास्तूला पर्यटनाचा ‘क’ दर्जा देण्यास विरोध केला.
 पोखरण वास्तूच्या आजूबाजूला नवीन इमारती झाल्या आहेत. त्या रहिवाशांच्या रहिवाशाचा प्रश्न निर्माण होईल. त्या भागात बांधकामे करता येणार नाहीत, अशी भीती अन्य शिवसेना सदस्यांनी व्यक्त केली. मनसेचे आमदार प्रकाश भोईर यांनी पोखरण वास्तूच्या सुशोभकरणासाठी पुढाकार घेतला आहे. जिल्हा नियोजन विकास समितीच्या बैठकीत पोखरण वास्तूला ‘क’ दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून घोषित केले तर या भागात पर्यटनविषयक सुविधा देणे शक्य होईल. या हेतुने जिल्हाधिकाऱ्यांनी पोखरण वास्तूला पालिकेच्या ‘क’ दर्जा पर्यटनस्थळास मान्यता मिळावी म्हणून एक प्रस्ताव महापालिका प्रशासनाला पाठविला आहे. हा प्रस्ताव आयुक्तांनी सर्वसाधारण सभेच्या मान्यतेसाठी आणला होता. त्यामुळे पोखरण विकासाच्या श्रेयावरून शिवसेना, मनसेत श्रेयाची लढाई रंगली होती. त्यामुळेच मनसे आमदाराचा हा प्रस्ताव शिवसेनेच्या नगरसेवकांनी संख्याबळाच्या जोरावर हाणून पाडल्याची चर्चा आता रंगली आहे. यासंबंधी उपायुक्त आयुक्त संजय घरत यांनी सांगितले, शासनाने फक्त ‘क’ दर्जाला सर्वसाधारण सभेत मान्यता द्यावी एवढेच प्रस्तावात म्हटले आहे. शासनाने पर्यटनस्थळ म्हणून पोखरणला घोषित केलेले नाही. पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून पोखरण भागात विकासकामे करणे हा शासनाचा मुख्य हेतू असल्याचे ते म्हणाले. या प्रकल्पासाठी शासनाकडून एक कोटी निधी मिळू शकतो, असेही घरत यांनी स्पष्ट केले. या वेळी मनसेचे विरोधी पक्षनेते मंदार हळबे यांनी पर्यटनस्थळाला मंजुरी देण्यात यावी. नंतर शासन योग्य निर्णय घेईल. भाजपचे गटनेते श्रीकर चौधरी, विश्वनाथ राणे यांनी प्रथम हेरिटेजची यादी प्रसिद्ध करा. पोखरण स्वच्छ करून घ्या. मग पर्यटनाचा विचार करा, असे सूचित केले.