शहरात वेगवेगळ्या आजारांची साथ पसरली असताना शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याने सोसायटीच्या स्वच्छता कामात सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरल्याची तक्रार केली जात आहे. राजकीय प्रभावाचा वापर करत पोलीस व महापालिकेला कामकाज करण्यास प्रतिबंध केला जात आहे. याविषयी विचारणा करणाऱ्या स्थानिक नागरिकांना दमबाजी करणे, हुज्जत घालून सोसायटीत दहशतीचे वातावरण निर्माण करणे असे आरोप रहिवाशांनी केले आहे. याबाबत दोन दिवसांत पालिकेने कारवाई न केल्यास रहिवाशांनी आमरण उपोषण अथवा शिवसेनेच्या पक्षप्रमुखांची भेट घेऊन दाद मागण्याचा इशारा दिला आहे.
शुचितानगर येथील लेन क्रमांक २ मधील राज अपार्टमेंट-ब इमारतीत हा प्रकार सुरू असल्याची तक्रार नागरिकांनी केली. तळमजल्यावर शिवसेना महिला आघाडीच्या शहराध्यक्षा अ‍ॅड. शामला दीक्षित आणि त्यांचे पती डॉ. हेमंत दीक्षित राहतात. तळमजल्यावर आसपासच्या भागात खालील बाजूने सांडपाणी, मैला वाहून नेणारी वाहिनी टाकण्यात आली आहे. त्या ठिकाणी दीक्षित यांनी अतिक्रमण केल्याची तक्रार नागरिकांनी केली. या ठिकाणी पुढील बाजूस प्रशस्त दिवाणखाना, तर मागील बाजूस तीन सुसज्ज खोल्या बांधण्यात आल्या. हे बांधकाम करताना सोसायटीतील अन्य रहिवाशांशी कोणतीही चर्चा केली नाही. इमारतीत २० हून अधिक कुटुंबे राहत आहेत. जमिनीखालील वाहिनीत काही दोष निर्माण झाल्यामुळे पाणी तुंबण्याचा प्रकार घडतो. रहिवासी दुरुस्तीसाठी खर्च करण्यास तयार असले तरी त्यात अतिक्रमणाचा अडथळा येत आहे.
या संदर्भात गतवर्षी इंदिरानगर पोलीस स्थानक तसेच महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे तक्रार करण्यात आली होती. मात्र त्या वेळी संबंधितांनी पालिका आरोग्य अधिकाऱ्यांना शिवीगाळ करत स्थानिक नागरिकांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला, यामुळे आम्ही पोलीस आयुक्तांना निवेदन देऊन लक्ष घालण्याची विनंती केली असे स्थानिक नागरिकांनी सांगितले. मात्र वर्षभरात पोलीस किंवा महापालिका या भागाकडे अद्याप फिरकलेली नाही. केवळ राजकीय दबावापोटी सोसायटीचा अंतर्गत प्रश्न या सबबीखाली संबंधित यंत्रणांनी अंग झटकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. शहर परिसरात डेंग्यूसह इतर साथीचे आजार वाढत आहेत. या स्थितीत इमारतीचे गटार तुंबले आहेत. इमारतीत ये-जा करण्याच्या रस्त्यावर दरुगधीयुक्त पाणी साचले असून सर्वाचे आरोग्य धोक्यात आले आहे. इमारतीतील दोन रहिवाशांना डेंग्यूसदृश आजार झाला असून उर्वरित तीन जणांना गावी पाठविण्यात आले आहे. याबाबत दीक्षित यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून कोणतेही सहकार्य मिळत नाही अशी तक्रारही स्थानिक नागरिकांनी केली. उलटपक्षी, मारहाण करण्याची धमकी दिली जाते. शिवसेनेचे शहराध्यक्ष अजय बोरस्ते, संपर्क नेते रवींद्र मिर्लेकर यांच्याकडे तक्रार केली असता संबंधितांनी दीक्षितांना पाठीशी घालण्याचे धोरण अवलंबिल्याचे स्थानिकांनी सांगितले.
याप्रकरणी सर्व स्तरांवर प्रयत्न करूनही कारवाई होत नाही. यामुळे पुढील दोन दिवसांत पालिकेने कारवाई न केल्यास रहिवाशी आमरण उपोषणास बसतील, तसेच काहींनी पक्षश्रेष्ठी उद्धव ठाकरे यांची भेट घेत हा संपूर्ण प्रकार कथन करावयाचे ठरविले आहे.

केवळ राजकीय अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न
मी सुज्ञ नागरिक आहे. रहिवाशांनी केलेल्या तक्रारीत तथ्य नाही. माझे बांधकाम पाडल्यामुळे जर ढापे तुंबले असतील तर त्यात आपला काय दोष? उलट तेथील ढापे उघडय़ा अवस्थेत आहेत, ज्यामुळे आपणास आणि कुटुंबातील सदस्यांना अधिक त्रास होत आहे. याबाबत आपण राजकीय पदाचा वापर केलेला नाही. रहिवाशांकडून उलटपक्षी राजकीय अस्तित्व संपवण्याच्या धमक्या दिल्या जात आहे. या प्रकाराबाबत इंदिरानगर पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
अ‍ॅड. शामल दीक्षित (शिवसेना, महिला आघाडी अध्यक्षा)