आयएएस, आयएफएस, आयपीएस या केंद्रीय प्रशासकीय सेवा परीक्षेत यशस्वी झालेल्या मराठी अधिकाऱ्यांचा सत्कार करून न थांबता या सेवांमध्ये मराठी टक्का वाढविण्यासाठी शिवसेनेच्या युवासेनेने एक विशेष मोहीम हाती घेतली आहे. याअंतर्गत १०० उमेदवारांची निवड करून त्यांना वर्षभर मोफत प्रशिक्षण देऊन ‘तयार’ करण्यात येणार आहे.
मराठी माणसाला महाराष्ट्रात नोकरीत डावलेले जाऊ नये यासाठी शिवसेनेची स्थापना करणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून ‘शिवविद्या प्रबोधिनी’च्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. केवळ नोकरीपुरता विचार न करता शासकीय सेवेतील उच्चपदांसाठी मराठी तरुण तयार करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. यातूनच आयएएसच्या पूर्व परीक्षेपासून ते थेट मुलाखतीपर्यंत या विद्यार्थ्यांना विनामूल्य प्रशिक्षण तसेच त्यांना अपेक्षित असणारी सर्व मदत करण्यात येणार आहे, असे शिवसेना उपनेते विजय कदम यांनी सांगितले. आयएएसच्या मुख्य परीक्षेत यश मिळवायचे तर दिल्लीतील कोचिंग क्लासेसना पर्याय नाही, हा गैरसमज दूर करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. गेली १२ वर्षे आयएएसच्या परीक्षेत यशस्वी होणाऱ्यांचे सत्कार केले आता मराठी सनदी अधिकारी घडविण्याचे काम केले जाणार असून यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांचे मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाणार आहे. महाराष्ट्रात सध्या कार्यरत असलेल्या सनदी अधिकाऱ्यांमध्ये या उपक्रमातून मराठी टक्का वाढेल असा विश्वास कदम यांनी व्यक्त केला.
दिल्लीत राहणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांला प्रतिवर्षी दोन लाख रुपये अभ्यासक्रमासाठी व दोन लाख रुपये राहण्यासाठी खर्चावे लागतात. गरीब विद्यार्थ्यांना इतका खर्च परवडत नाही. पुस्तके, मार्गदर्शक मिळत नाही. या अडचणी दूर व्हाव्यात यासाठी मराठी तरुणांना ही संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. या उपक्रमाची सविस्तर माहिती आणि अर्ज प्रबोधिनीच्या संकेतस्थळावर उपलब्ध होईल. १७ ते ३१ डिसेंबर दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जातील. अर्जदारांची प्रवेश परीक्षा ५ जानेवारी घेण्यात येईल. ११ जानेवारीला निकाल जाहीर केल्यानंतर ७ जानेवारीपर्यंत यशस्वी उमेदवारांना प्रवेश घेण्याची संधी दिली जाईल. प्रत्यक्ष प्रशिक्षण वर्ग २३ जानेवारीपासून सुरू होतील. संपर्क – http://www.shivvidyaprabodhini.co.in आगामी काळात केवळ युपीएससी तसेच आयआयटीच्या प्रवेश परीक्षांसाठी अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांकरता सुसज्ज ग्रंथालय निर्माण करण्याची युवासेनेची योजना आहे.
शिवसेना यूपीएससीसाठी १०० उमेदवारांना ‘तयार’ करणार
आयएएस, आयएफएस, आयपीएस या केंद्रीय प्रशासकीय सेवा परीक्षेत यशस्वी झालेल्या मराठी अधिकाऱ्यांचा सत्कार करून न थांबता
First published on: 18-12-2013 at 07:59 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena set to charge 100 upsc exam candidates