ऐन सणासुदीच्या काळातच महापालिकेचा पाणीपुरवठा विस्कळीत होतो, हा शिवसेनेला बदनाम करण्याचा प्रयत्न तर नाही ना, अशी शंका मनपातील सत्तेचे सर्वेसर्वा असलेल्या सेना आमदार अनिल राठोड यांनीच आज अधिकाऱ्यांसमोर व्यक्त केली. मनपाचे कामकाज एकदम खराब चालले असून त्यात सुधारणा करा, काहीतरी सिस्टिम लावा, असे त्यांनी सांगितले.
गेले काही दिवस शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून त्यासंदर्भात राठोड यांच्या उपस्थितीत आज मनपात बैठक झाली. आयुक्त विजय कुलकर्णी, स्थायी समिती सभापती बाबासाहेब वाकळे, उपसभापती मालनताई ढोणे, नगरसेवक संभाजी कदम, दिलीप सातपुते, दिपक खैरे, तसेच माजी नगरसेवक अनिल शिंदे आदी बैठकीला उपस्थित होते.
या विभागाचे प्रमुख परिमल निकम, तसेच स्वत: आयुक्त कुलकर्णी त्यांना वीजपुरवठा खंडीत होत असल्याने पाणी वितरीत करण्याच्या वेळा बदलतात असे सांगत होते. ग्रामीण भागासाठी पाणी दिले जाते ते बंद करा असे यावेळी सातपुते यांनी सांगतिले. मनपा दरमहा १ कोटी रूपयांपेक्षा जास्त वीज बील देत असताना त्यांच्याकडून अशी सेवा का मिळते असा प्रश्न कदम यांनी केला. खैरे यांनी अधिकाऱ्यांना विचारणा केली, टँकर मागितले तर दुरूत्तरे केली जातात असे सांगितले.     
शिवसेना पायघडय़ा घालील..
केडगाव देवीकडे बहुतेक भाविक नवरात्रात पायी जातात, मनपाने या रस्त्यावर केलेले पॅचिंग पायाला टोचणारे झाले आहे, ते उद्याच दुरूस्त झाले पाहिजे, नाहीतर शिवसेना भाविकांसाठी या रस्त्यावर पायघडय़ा घालेल व त्याचा सर्व खर्च अधिकाऱ्यांकडून वसूल करेल, असा इशारा राठोड यांनी दिला. शहर अभियंता नंदकुमार मगर यांनी रस्त्यावरून रोलर फिरवण्याचे काम सुरू झाले आहे, अशी माहिती बैठकीत दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा