पंचगंगा नदीच्या प्रदूषणास आवर घालण्यास अपयशी ठरलेल्या महापालिका व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांविरुद्ध शंखध्वनी करीत शुक्रवारी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. उपजिल्हाधिकारी संजय पवार यांच्याशी झालेल्या चर्चेवेळी शिवसेनेने उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यास महापालिका व प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी अपयशी ठरले. शिवसैनिकांनी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला असता त्यांची व पोलिसांची झटापट झाली.    
पंचगंगा नदी प्रदूषित करणाऱ्या सर्व घटकांवर कारवाई करावी, या मागणीसाठी शिवसेनेने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी महापालिका व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या नावाने शंखध्वनी केला. शिवसैनिकांनी उपजिल्हाधिकारी संजय पवार यांची भेट घेऊन शहरातील उद्योग, रसायनयुक्त सांडपाणी, मैलामिश्रित सांडपाणी, राजाराम साखर कारखान्यातून बाहेर पडणारे मळीमिश्रित सांडपाणी हे थेट पंचगंगा नदीमध्ये सोडले जाते. याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी अर्थपूर्ण व्यवहारातून सोयीस्कररीत्या दुर्लक्ष करीत असल्याने पंचगंगा नदी प्रदूषित झाली आहे.
कावीळ, गॅस्ट्रो, कॉलरा, डेंग्यू यांसारख्या गंभीर आजाराने मे २०१२ मध्ये ४० नागरिकांना जीव गमवावा लागला होता. त्या वेळी राज्य शासन, जिल्हा प्रशासन, कोल्हापूर महापालिका, इचलकरंजी नगरपालिका यांनी कावीळ संदर्भात व पाणी प्रदूषणाबाबत उपाययोजना आखल्या होत्या. त्या कागदोपत्रीच राहिल्याने नोव्हेंबर महिन्यात पुन्हा काविळीच्या आजाराने डोके वर काढले आहे. प्रदूषणाला आवर घालण्यास महापालिका व प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी अपयशी ठरल्याने त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.
या चर्चेत इचलकरंजी शहरप्रमुख धनाजी मोरे, उपजिल्हाप्रमुख मधुकर पाटील, साताप्पा भवान, सतीश मलमे, बाजीराव पाटील, महादेव गौड, वैभव उगळे, सयाजी चव्हाण, राजू आलासे, शिवाजी पाटील आदींनी भाग घेतला.
 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा