राजर्षी शाहू जन्मस्थळाच्या नूतनीकरण कामात भ्रष्टाचार होत असून, कामाचा दर्जा खालावला आहे, असा आरोप करीत शिवसेनेच्या वतीने सोमवारी शाहू जन्मस्थळ येथे निदर्शने करण्यात आली. पुरातत्त्व विभागाचे कनिष्ठ अभियंता अनंत पाटील यांना घेराव घालून काम बंद करण्यास भाग पाडले.    
लक्ष्मी-विलास पॅलेस या शाहू जन्मस्थळाचे नूतनीकरण व सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. गेली अनेक वर्षे हे काम केले जात असून ते रखडत चालले आहे. या कामामध्ये दिरंगाई होत आहे. बांधकामास लागणाऱ्या वस्तू ठेकेदार चढय़ा दराने खरेदी करून भ्रष्टाचार करीत आहेत, असा आरोप शिवसेनेने केला आहे. या कामाची वस्तुस्थिती तपासण्यासाठी जिल्हाप्रमुख संजय पवार, जिल्हाप्रमुख विजय देवणे, बाजीराव चौगुले, शिवाजी जाधव, दिलीप पाटील, तानाजी आंग्रे, हर्षल सुर्वे यांच्यासह शिवसैनिक शाहू जन्मस्थळी गेले होते.    
या कामासाठी शासनाकडून निधी मिळून तीन ते चार वर्षे झाली. पण काम दर्जात्मक व नियोजित वेळेत पूर्ण का झाले नाही, अशी विचारणा तेथे उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना केली. भ्रष्टाचारमुक्त व नियोजित वेळेत काम पूर्ण होण्यासाठी संबंधित घटकांची तातडीने बैठक घ्यावी, या बैठकीला शिवसेनेला निमंत्रित करावे, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करणारे निवेदन देण्यात आले. ही बैठक होईपर्यंत शिवसेना हे काम बंद ठेवेल असा इशाराही देण्यात आला.