शहरातील झूम कचरा प्रकल्पाच्या दुरवस्थेकडे जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी निदर्शने केली. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना थेट प्रकल्पस्थळी येण्यास आमदार राजेश क्षीरसागर यांनी भाग पाडून तेथील विदारक परिस्थिती दाखवून दिली. अखेर या प्रश्नावर निर्णय घेण्यासाठी आठवडय़ाभरात बैठक बोलावण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी दिले.    
कोल्हापूर शहरामध्ये कचऱ्याच्या समस्येने उग्र स्वरूप धारण केले आहे. झूम कचरा प्रकल्पाच्या ठिकाणी त्याच्या वस्तुस्थितीची कल्पना येते. कचऱ्याच्या उंचच उंच टेकडय़ा तिथे उभ्या राहिल्या आहेत. कचरा पेटवून दिल्याने प्रदूषणाची समस्या वाढली आहे. प्रकल्पात कचरा सामावण्याची क्षमता संपलेली आहे. मोकाट कुत्र्यांमुळे परिसरातील नागरिकांना जीव मुठीत घेऊन वावरावे लागत आहे.     
या प्रश्नाकडे जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आमदार क्षीरसागर, उपशहरप्रमुख जयवंत हरूगले, रमेश खाडे, दुर्गेश लिंग्रज, राजू पाटील, पूजा भोर, कमल पाटील, पूजा कामत, मंगल कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. त्यानंतर आमदार क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी माने यांना निवेदन देऊन कचरा प्रकल्पामुळे नागरिकांना कशा प्रकारे यातना भोगाव्या लागत आहेत, याची कल्पना दिली. बैठकीवेळी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी सुदाम डोके व दुर्गुळे उपस्थित होते. त्यांना कचऱ्याच्या प्रदूषणाला आवर घालण्यात अपयशी ठरल्याबद्दल जाब विचारण्यात आला. शिवाय या दोघांना प्रकल्पस्थळी नेऊन तेथील परिस्थिती दाखवून दिली. कचरा प्रकल्पस्थळी पोहोचल्यावर तेथील दरुगधीने आंदोलकांसह अधिकाऱ्यांनाही शिशारी आली. नाकाला रुमाल, पदर लावतच सर्वजण प्रकल्पस्थळी पोहोचले. जागोजागी पेटलेले कचऱ्याचे ढीग, भटकी जनावरे, प्रदूषणाची समस्या दाखवून देत याला आवर घालावा, अशी मागणी क्षीरसागर यांनी केली. पुढील आठवडय़ामध्ये बैठक घेऊन या प्रश्नी मार्ग काढण्याचे आश्वासन देत अधिकाऱ्यांनी सोडवणूक करून घेतली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा