अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेचा शिवा गुणवंत पुरस्कार यंदा बारावीत राज्यात द्वितीय ठरलेला नांदेडच्या सुमीत अनंत धुळशेट्टे याला जाहीर झाला असून २८ नोव्हेंबरला मराठवाडय़ातील बीड जिल्ह्य़ातील श्रीक्षेत्र कपीलधार येथे आयोजित राज्यव्यापी मेळाव्यात तो प्रदान केला जाईल.
शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेतर्फे विविध क्षेत्रातील मान्यवरांना राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान केले जातात. संघटनेचे प्रांत उपाध्यक्ष अभय कल्लावार यांचे आई-वडील मनोहर व विमल कल्लावार यांच्या स्मृतीनिमित्त दरवर्षी शिवा गुणवंत पुरस्कार दिला जातो. पाच हजार रुपये रोख व प्रमाणपत्र, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
अन्य वर्गवारीत विदर्भातील उत्कृष्ट शाखा म्हणून कारंजा लाड शाखेची तर उत्कृष्ट कार्यकर्ता म्हणून आकोटच्या संजयआप्पा गोरे याची निवड झाली. ठाण्याच्या रूपेश होनराव याची उत्कृष्ट रक्तदाता म्हणून निवड झाली. चिखलीचे अजय ठेंगझोडे यांची उत्कृष्ट साहित्यिक पुरस्कारासाठी निवड झाली. बीड जिल्ह्य़ातील कपीलधार हे महाराष्ट्र, आंध्र प्रदेश व कर्नाटक राज्यातील लाखो वीरशैव बांधवांचे श्रद्धास्थान असून तेथे सोळाव्या शतकातील वीरशैव संत संत शिरोमणी मन्मथस्वामी यांची संजीवन समाधी आहे. तेथे २८ नोव्हेंबरला दुपारी ४ वाजता राज्यस्तरीय मेळावा आयोजित करण्यात आला आहे. त्याचे उद्घाटन शिवा संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे यांच्या हस्ते होईल. अभय कल्लावार, शिवचरण पाटील बिराजदार, डॉ. वाय. बी. सोनटक्के व इतर प्रांत पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित राहतील.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा