शिवाजी पार्कच्या वापरासंबंधात उद्भवलेल्या न्यायालयीन वादामुळे गेली काही वर्षे साजरा होऊ न शकलेला दादरच्या बालमोहन विद्या मंदिर शाळेचा बालदिन यंदा मोठय़ा धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. महिनाभरापूर्वी उच्च न्यायालयाने शाळेला बालदिन साजरा करण्यास कायमस्वरूपी परवानगी दिल्यामुळे या वेळच्या बालदिनात एक आगळाच उत्साह होता.
शाळेचे संस्थापक आणि शिक्षणमहर्षी दादासाहेब रेगे यांनी ‘बालदिन’ या नावाने मुलांचा सामुदायिक वाढदिवस मकरसंक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी साजरा करण्याची प्रथा १९४० या शाळेच्या स्थापनेच्या वर्षांपासून सुरू केली. तेव्हापासून बालदिन आणि शिवाजी पार्कचे एक वेगळेच नाते जुळले आहे. पण, शिवाजी पार्कचा परिसर ‘शांतता क्षेत्रा’त मोडत असल्याच्या वादामुळे गेली काही वर्षे शाळेला या मैदानावर बालदिन साजरा करण्यास मज्जाव करण्यात येत होता. या वर्षी न्यायालयाने परवानगी दिल्याने शाळेचा वार्षिकोत्सव मोठय़ा जोशात साजरा करण्यात आला आणि बऱ्याच वर्षांनी बालदिनाच्या निमित्ताने शिवाजी पार्कचा परिसर बालगोपाळांच्या घोषणांनी दुमदुमून गेला.
मंगळवारी सकाळी सनईचौघडय़ांच्या निनादात पुष्पवृष्टी करून विद्यार्थ्यांचे शाळेत स्वागत करण्यात आले. त्यानंतर शाळेच्या चार हजार विद्यार्थ्यांना शिवाजी पार्कवर नेण्यात आले. सामूदायिक प्रार्थना, पाहुण्यांना मानवंदना, छात्रसेना, रहदारी संरक्षक दल, बालवीर, बालिका शिशुवीर, बुलबुल यांचे संचलन झाले. त्यानंतर पूर्व प्राथमिक विभागाची मुलांची पारंपरिक वेशात फेरी काढण्यात आली. त्यांच्यासोबत होती बालतरुची पालखी. सायकलस्वार विद्यार्थ्यांनी बँडच्या तालावर दिलेली मानवंदना, सांघिक गीते आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम झाल्यानंतर विद्यार्थ्यांची शिवाजी पार्कच्या परिसरात मिरवणूक काढण्यात आली. या परिसरातील रहिवाशांनाही बालदिनाचे मोठे कौतुक आहे. दाराखिडक्यांमधून हजारो डोळे या विद्यार्थ्यांना कौतुकाने न्याहाळत होते. मुले हेच घराचे अलंकार, मुले हीच राष्ट्राची संपत्ती आदी घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले. मुले वर्गात पोहोचल्यानंतर त्यांना तीळगुळ देऊन मकरसंक्रातींच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

Story img Loader