शहराच्या मध्यवर्ती भागातील छत्रपती शिवाजी महाराज मैदानाचा उपयोग विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी होण्याऐवजी पैसे कमविण्याच्या उद्देशाने इतर व्यावसायिक कामांसाठीच केला जात आहे. हे मैदान केवळ खेळण्यासाठी वापरण्यात यावे अशी मागणी शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी केली आहे.
जिल्हा परिषदेच्या ताब्यात असलेले पूर्वीचे जी. एस. हायस्कूल मैदान आता छत्रपती शिवाजी मैदान म्हणून ओळखले जाते. या मैदानावर वर्षभर कोणते तरी प्रदर्शन, मेळावे, ग्राहक बाजारपेठ, लग्न समारंभ आयोजित होत असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या खेळण्यासाठी असलेले हे मैदान त्यांना खेळण्यासाठी मिळतच नाही.
शहरातील जिल्हा क्रीडा संकुल सर्वसामान्यांच्या आवाक्यात नाही. संकुलात विविध क्रीडा प्रकारांसाठी स्वतंत्र विभाग आहेत.
तथापि, तेथील शुल्क सामान्य शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परवडणारे नसल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. छत्रपती शिवाजी मैदानावर कधी काळी विशेषत्वाने सुट्टय़ांच्या दिवशी सकाळपासूनच विद्यार्थ्यांची खेळण्यासाठी गर्दी असे. या मैदानांवर कुस्तीसह अन्य खेळांचे राज्य व राष्ट्रस्तरीय सामन्यांचेही आयोजन केले गेले आहे.
अलीकडे आर्थिक लाभाच्या मोहात हे मैदान   इतर व्यावसायिक कामांसाठी   वापरण्यात येत असल्याने विद्यार्थी खेळाडूंची  गैरसोय होत आहे.   मध्यवर्ती भागातील हे मैदान केवळ खेळण्यासाठी राखीव ठेवण्याची    मागणी   नितीन चंदनकर, दिनेश गवळी, राजेश सोनवणे, अनिल मराठे आदींनी केली आहे.

Story img Loader