जालना जिल्ह्य़ातील जांबसमर्थ नावाचे छोटेसे गाव. या गावाचे ऐतिहासिक महत्त्व म्हणजे हे समर्थ रामदास स्वामींचे जन्मगाव! या गावातील शेतकऱ्याच्या कुटुंबातील तेरा मुलांनी आपल्या गावात रंगभूमी चळवळ सुरू केली. गावातून जिल्हा पातळीवर, त्यानंतर औरंगाबाद आणि मग पुणे-मुंबई असा एक एक टप्पा पार करीत या मुलांनी आता थेट दिल्लीचे तख्त गाठले आहे. या मुलांनी एकत्र येऊन बसवलेल्या ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ या नाटकाची निवड नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या ‘भारङ्म’ या आंतरराष्ट्रीय नाटय़ महोत्सवात झाली आहे. हे तेरा शिलेदार आता १८ जानेवारीला दिल्लीत या नाटकाचा प्रयोग सादर करणार आहेत.
जालन्यातल्या जामसमर्थ गावातील ही १३ मुले गेली पंधरा वर्षे आपल्याच गावात नाटक करीत होती. त्यांची ही कामगिरी केवळ नाटक करणे, एवढीच मर्यादित न राहता त्यांनी नाटय़विषयक अनेक घडामोडीही आपल्या गावात घडवून आणल्या. त्यानंतर जिल्हास्तरावर ही मंडळी पोहोचणे अनिवार्य होते. जालन्यातही त्यांनी चमक दाखवत लवकरच औरंगाबाद या मोठय़ा केंद्राकडे झेप घेतली. तेथेही आपले नाणे खणखणीत वाजवल्यानंतर त्यांनी पुणे-मुंबई काबीज करण्याच्या दृष्टीने आपली पावले टाकली. येथे त्यांना मदत झाली ती राजकुमार तांगडे यांनी लिहिलेल्या ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ या नाटकाची.
‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ या चित्रपटात दादासाहेब फाळके यांची भूमिका साकारणाऱ्या नंदू माधव यांनी हे नाटक दिग्दर्शित केले. शिवाजी महाराज हे इस्लाम धर्माच्या विरोधात नव्हते, हे या नाटकातून समर्थपणे दाखविण्यात आले आहे. शाहीर संभाजी भगत यांनी या नाटकाचे संगीत दिग्दर्शन केले आहे.
नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा या दिल्लीतील ख्यातनाम संस्थेतर्फे दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या ‘भारङ्म’ महोत्सवात या नाटकाची निवड झाली आहे.
या महोत्सवात जागतिक रंगभूमीवरील दर्जेदार नाटके सादर केली जातात. या महोत्सवात आपल्या नाटकाची निवड होणे हे जालन्यातील लहानशा गावातून आलेल्या सगळ्याच मुलांसाठी खूप मोठे आहे, अशी प्रतिक्रिया दिग्दर्शक नंदू माधव यांनी ‘रविवार वृत्तांत’शी बोलताना व्यक्त केली.
सुमारे चार शतकांपूर्वी महाराष्ट्रात होऊन गेलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची दखल त्याही वेळी दिल्लीतील मुघल सम्राटांना घ्यावी लागली होती. आता आमच्या या ‘शिवाजी’ची दखल घेण्यासही आम्ही दिल्लीतील लोकांना भाग पाडले आहे, असे माधव म्हणाले.
हा महोत्सव दिल्लीत एनएसडीमध्ये १३ जानेवारीपासून सुरू होत असून १८ जानेवारी रोजी ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ या नाटकाचा प्रयोग रंगणार आहे.