सोलापुरातील मराठा समाज सेवा मंडळाच्या वतीने यंदा शिवजयंतीनिमित्त ४२ व्या शिवछत्रपती व्याख्यानमालेचे आयोजन येत्या १६ ते १८ फेब्रुवारी या तीन दिवसांच्या काळात करण्यात आल्याचे संस्थेचे अध्यक्ष, माजी महापौर मनोहर सपाटे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.  यंदा शिवजयंतीचे औचित्य साधून संस्थेच्या शिक्षण संकुलात शिवछत्रपतींची सिंहासनारूढ पुतळ्याची प्रतिष्ठापना येत्या शनिवारी, १६ फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता सोलापूरचे पालकमंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी स्थानिक लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, वरिष्ठ शासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. दररोज सायंकाळी ६.३० वाजता छत्रपती शिवाजी प्रशालेच्या प्रांगणात (शिवतीर्थ) आयोजित या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प १६ रोजी प्रा. मधुकर पाटील (‘राष्ट्राच्या जडणघडणीत युवक व युवतींचे योगदान’) हे गुंफणार आहेत. १७ रोजी दुसरे पुष्प डॉ. शिवरत्न शेटे (छत्रपती शिवरायांकडून काय शिकावं?) हे गुंफणार आहेत तर १८ रोजी डॉ. राजेंद्र पवार यांच्या व्याख्यानाने (आनंदी जीवनाची पंचसूत्री) या व्याख्यानमालेचा समारोप होणार आहे. १९ रोजी शिवजयंतीनिमित्त मध्यवर्ती शिवजयंती उत्सव महामंडळाच्या वतीने निघणाऱ्या मिरवणुकीतील सहभागी सर्व मंडळांचे स्वागत केले जाणार असल्याचे सपाटे यांनी सांगितले.

Story img Loader