नोव्हेंबरच्या मध्यावर अंतर्धान पावलेल्या थंडीचे जोरदार पुनरागमन झाले असून गुरूवारी यंदाच्या हंगामातील नीचाकी तापमानाची नोंद झाली. पारा ६.२ अंशावर जाऊन घसरल्याने अक्षरश: हुडहुडी भरल्याचे चित्र आहे. उत्तरेकडून वाहत येणाऱ्या वाऱ्यामुळे नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट आली असून पुढील तीन ते चार दिवसात तापमान आणखी खाली जाण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. दरम्यान, भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या शहरी भागातील केंद्रावर तापमानाची ६.२ अंश नोंद झाली असताना दुसरीकडे ग्रामीण भागात म्हणजे द्राक्ष बागांमधील खासगी स्वरूपाच्या स्वयंचलीत हवामान केंद्रांवर कुठे ४.४ अंश तर कुठे १० अंशाहून अधिक असल्याची वेगवेगळी आकडेवारी समोर आल्याने बागायतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
थंडीविना दिवाळी गेल्यानंतर नाशिकसह उत्तर महाराष्ट्राच्या तापमानात झपाटय़ाने बदल झाले आणि तापमानाने हंगामातील नीचांकी अर्थात ८ अंशाची पातळी गाठून यंदा हिवाळ्याचा बाज काही और राहणार असल्याचे अधोरेखीत केले होते. परंतु, गारव्याचा हा आनंद फार काळ टिकू शकला नाही. नोव्हेंबरच्या अखेरीस अंतर्धान पावलेली थंडी कित्येक दिवस परतलीच नाही. बुधवारी रात्रीपासून तिचे पुनरागमन झाले. नाशिकसह उत्तर महाराष्ट्राच्या तापमानावर उत्तरेकडून वाहत येणाऱ्या वाऱ्याचा प्रभाव असतो. उत्तरेकडे थंडीची लाट आली असताना त्या भागातून वाहत येणाऱ्या वाऱ्याचा वेग ताशी सहा किलोमीटरवर गेल्यामुळे उत्तर महाराष्ट्राचे तापमान कमी झाल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांनी
म्हटले आहे. पाच दिवसांपूर्वी नाशिकचे १६.६ अंशावर असणारे तापमान गुरूवारी सकाळी ६.२ अंशावर आले. आकाश निरभ्र असल्याने हे तापमान आणखी
खाली जाऊ शकते, असेही हवामानशास्त्र विभागाने म्हटले आहे. महिनाभर मिळू न शकलेल्या
गुलाबी थंडीचा आनंद घेण्याची
संधी नववर्षांच्या पाश्र्वभूमीवर
प्राप्त होईल, अशी चिन्हे आहेत. मागील हंगामात नाशिकच्या तापमानाचा पारा ९ फेब्रुवारी रोजी २.७ अंशावर गेला होता. यापूर्वी नाशिकमध्ये नीचांकी तापमानाची नोंद डिसेंबर व जानेवारीच्या महिन्यात अनेकदा झाली आहे. यंदा पुन्हा त्याची पुनरावृत्ती होत असल्याचे दिसत आहे.
उत्तरेकडील वाऱ्याच्या वेगावर थंडीचे पुनरागमन अवलंबून होते. मध्यंतरी हा वेग मंदावला असताना आकाशही ढगाळ झाल्यामुळे दिवसा उन्हाळा असल्यासारख्या वातावरणास सामोरे जावे लागले. परंतु, वाऱ्याचा वेग व निरभ्र आकाश झाल्यावर तापमानाची पातळी खाली येण्यास सुरूवात झाली. तापमानाच्या या आकडेवारीबद्दल कमालीचा गोंधळ निर्माण झाला आहे.  निफाड तालुक्यातील स्वयंचलीत केंद्रावर ४.४ अंश तापमानाची नोंद झाली तर द्राक्ष उत्पादकांकडील खासगी स्वरूपाच्या स्वयंचलीत हवामान केंद्रांवर ही नोंद मौजे सुकेणे १२, पांढुर्ली ९.९ तर उगावला ११.३ या प्रकारे या वेगवेगळ्या नोंदी असून बहुतेक ठिकाणी तापमान १० अंश असल्याचे दिसते. परंतु, कडाक्याची थंडी असताना या यंत्रणेवर चुकीची नोंद झाली असावी, अशी शंका द्राक्ष बागायतदार संघाचे पदाधिकारी विजय गडाख यांनी व्यक्त केली. कारण, निफाड तालुक्यातील शासनाच्या केंद्रावर ४.४ अंश नोंदले गेले असताना त्या लगतच्या खासगी केंद्रावर तापमान १० अंशावर होते. संपूर्ण जिल्ह्यात सर्वात कमी तापमान निफाड तालुक्यात जाणवले असताना या वेगवेगळ्या नोंदीमुळे द्राक्ष बागायतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. जळगाव, धुळे व नंदुरबारमध्येही थंडीचे जोरदार आगमन झाले असून या परिसरातही नोंद घेण्यासाठी एखाद्या केंद्राचा अपवाद वगळता पुरेशी व्यवस्था नाही.
वास्तविक, यंदाचा हिवाळ्याचा हंगाम उत्तर महाराष्ट्रासाठी वेगळा ठरला असून या वर्षी सर्वाधिक काळ गारव्याची अनुभूती मिळण्याची शक्यता आहे. नोव्हेंबरमध्ये दाखल झालेल्या थंडीने डिसेंबरच्या अखेरीस नीचांकी पातळीची नोंद केली आहे. गेल्या चार ते पाच वर्षांतील नीचांकी पातळीचा आढावा घेतल्यास ही नोंद प्रामुख्याने जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात झालेली दिसते. यंदा महिनाभर आधीच ही पातळी गाठली गेल्याने हंगाम संपुष्टात येईपर्यंत म्हणजे किमान दीड ते दोन महिने हिवाळ्याचा आस्वाद घेता येईल, अशी स्थिती आहे. जळगावकरांमध्ये मात्र तापमानाच्या नोंदींवरून संभ्रम निर्माण झाला आहे. कारण, जळगाव व भुसावळच्या तापमानात चार ते पाच अंशांची तफावत आढळून येत असल्याने नेमके तापमान काय याचा अंदाज कुणाला बांधता येत नाही. जळगावमध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या केंद्रात ही नोंद घेतली जाते तर भुसावळ येथे हे काम केंद्रीय जल आयोगामार्फत केले जाते. या दोन्ही केंद्राच्या नोंदीत पडणारा हा फरक सर्वसामान्यांचा गोंधळ वाढवत आहे.  

Story img Loader