व्यावसायिक मराठी रंगभूमीचे हृदयस्थान असलेल्या दादर येथील श्री शिवाजी मंदिर नाटय़गृहाचा सुवर्णमहोत्सवपूर्ती सोहळा गुरुवार, ७ मे रोजी दुपारी ३.३० वा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात येणार आहे.
उद्योग मंत्री सुभाष देसाई या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष असून सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे हे विशेष अतिथी म्हणून हजर राहतील. याखेरीज नाटय़ परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी आणि नाटय़-व्यावसायिक निर्माता संघाचे अध्यक्ष प्रशांत दामले यांचीही या समारंभास सन्माननीय उपस्थिती असेल. या सोहळ्यात ‘चौरंग’ संस्थेचा ‘मंगलगाणी दंगलगाणी’ हा संगीत कार्यक्रम तसेच प्रा. दीपक देशपांडे यांचा ‘हास्यकल्लोळ’ हा एकपात्री हास्य-कार्यक्रम सादर होणार आहे. श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ ट्रस्टतर्फे सुरू करण्यात आलेले श्री शिवाजी मंदिर नाटय़गृह हे सुरुवातीला काही काळ खुले नाटय़गृह होते. ३ मे १९६५ रोजी त्याचे बंदिस्त नाटय़गृहात रूपांतर झाले. या बंदिस्त नाटय़गृहाच्या उद्घाटन सोहळ्यात शुभारंभाचा कार्यक्रम म्हणून लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांच्या गाण्यांचा कार्यक्रम झाला होता. परवा, ३ मे रोजी शिवाजी मंदिर नाटय़गृहास ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित अनौपचारिक सोहळ्यात गायिका सुलोचना चव्हाण यांना प्रमुख पाहुण्या म्हणून आवर्जून निमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी शिवाजी मंदिर नाटय़गृहाच्या आठवणींना यावेळी उजाळा दिला. त्यांनी लोकाग्रहास्तव ‘फड सांभाळ तुऱ्याला ग आला..’ ही त्यांची सुप्रसिद्ध लावणी पूर्वीच्याच तडफेनं आणि खणखणीत आवाजात सादर केली. श्री शिवाजी मंदिर नाटय़गृहाच्या सुवर्णमहोत्सवानिमित्ताने या रंगमंचावरून जे असंख्य कलाकार, रंगकर्मी घडले आणि पुढच्या काळात त्यांनी आपल्या कलाकर्तृत्वाचा ठसा रंगभूमीवर उमटविला, अशा नाटय़कर्मीचा स्वतंत्र सन्मान सोहळा लवकरच होणार आहे. शिवाजी मंदिरच्या वास्तूत संगीत रंगभूमीवरील दिवंगत अभिनेत्री जयमाला शिलेदार, अभिनेत्री भक्ती बर्वे आदी कर्तबगार स्त्री-रंगकर्मीची तैलचित्रेही लावण्यात येतील. त्याचप्रमाणे शिवाजी मंदिरच्या इतिहासाला उजाळा देणारी स्मरणिकाही प्रकाशित करण्यात येईल, असे श्री शिवाजी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष शशिकांत भालेकर आणि सरचिटणीस चंद्रकांत तथा अण्णा सावंत यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा