मोगलांनी मराठी मुलखात केलेल्या अपरिमित लुटीच्या वसुलीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवर स्वारी केली. त्या अतिशय योजनाबद्ध मोहिमेत फक्त श्रीमंतांकडूनच खंडणी मागण्यात आली. तरीही छत्रपतींच्या चरित्रातील या घटनेबद्दल गैरसमजच जास्त आहेत. मात्र यासंदर्भात ऐतिहासिक दस्तऐवज उपलब्ध आहेत. त्या आधारे गैरसमज दूर करण्यासाठी प्रसंगी गुजरातमध्ये जाऊन व्याख्याने देण्याची माझी तयारी आहे, असे प्रतिपादन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला अंबरनाथ येथील एका समारंभात  केले. या वेळी अंबरनाथकरांच्या वतीने बाबासाहेबांचा नागरी सत्कार करण्यात आला.
अंबरनाथ समन्वय प्रतिष्ठानच्या वतीने साई विभागात आयोजित एका समारंभात शहरातील विविध ज्ञातीतील गुणवंत व्यक्तींचा बाबासाहेबांच्या हस्ते गौरव करण्यात आला. अलीकडेच संपूर्ण भारतभर पदभ्रमण केलेले डोंबिवलीतील विद्याधर भुस्कुटे यांचाही या वेळी गौरव करण्यात आला. सत्कार सोहळ्यानंतर शिवचरित्रातील सुरतेची स्वारी या घटनेवर बाबासाहेब पुरंदरे यांनी त्यांच्या व्याख्यानात प्रकाशझोत टाकला.
शिवाजी महाराजांचे चरित्र करमणुकीसाठी नाही, तर ते अनुकरणीय आहे. त्यांच्या स्वभाववैशिष्टय़ांपैकी एक जरी गुण आपण अंगी बाणवला तरी आपले जीवन धन्य होईल, असेही ते म्हणाले.  
शिवाजी महाराजांसारख्या राष्ट्रपुरुषाविषयी प्रत्येकाच्या मनात आदर आहे. पुतळे अथवा स्मारके उभारायला हरकत नाही, पण मग त्यांची प्रतिष्ठा राखली गेली पाहिजे, असेही मत त्यांनी या वेळी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुण मैड यांनी केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा