* तिकीट दरांमध्ये ‘बेस्ट’ स्वस्त
* ‘एसटी’चा भर मात्र आरामदायक प्रवासावर
एसटी महामंडळाने मुंबईतील ‘वांद्रे-कुर्ला संकुल ते कांदिवली’ या मार्गावर शिवनेरी सेवा सुरू करण्याचे सुतोवाच केल्यानंतर आता ‘बेस्ट’पुढील समस्या वाढणार आहे. या पहिल्या प्रायोगिक तत्त्वावरील सेवेद्वारे एसटीने मुंबईतही हातपाय पसरण्याची नांदी केली असून यापुढेही अशा मार्गावर शिवनेरी सेवा सुरू करण्याचा मानस महामंडळाने बोलून दाखवला आहे. दुसऱ्या बाजूला ‘बेस्ट’च्या वातानुकुलित सेवेवर प्रवासी नाराज असल्याचे चित्र आहे. परिणामी आगामी काळात मुंबईत बेस्ट आणि एसटी या दोन संस्थांमध्ये संघर्ष होण्याची शक्यता आहे.
एसटीने वांद्रे-कुर्ला संकुल ते कांदिवली या मार्गावर आपली ‘शिवनेरी’ सेवा सुरू करताना लोअर परळ, वरळी या भागांतील कॉर्पोरेट कार्यालयांत काम करणाऱ्या प्रवाशांसाठीही लवकरच अशी सेवा सुरू करण्याचा मानस बोलून दाखवला आहे. आधीच तोटय़ात असलेल्या ‘बेस्ट’च्या वातानुकुलित सेवांपुढे त्यामुळे आव्हान उभे राहणार आहे. आम्ही रोज स्वत:च्या किंवा कंपनीच्या गाडीने कार्यालयात येणारे कर्मचारी डोळ्यासमोर ठेवून ही सेवा सुरू केली आहे. त्यांनी स्वत:च्या गाडीने न येता अत्यंत आरामदायक ‘शिवनेरी’ने हा प्रवास करावा, असे आमचे उद्दिष्ट आहे, अशी माहिती एसटीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. ‘शिवनेरी’ वातानुकुलित आहे, त्यात मोबाइल किंवा लॅपटॉप चार्जिगची सोय आहे, त्याशिवाय फुकट वायफाय सेवाही पुरवण्यात येते. त्यामुळे हा वर्ग आपला प्रवासातील वेळही सत्कारणी लावू शकतो, असे या अधिकाऱ्याने सांगितले.
‘शिवनेरी’च्या तुलनेत बेस्टच्या किंगलाँग बसेस कमी दर्जाच्या आहेत, ही गोष्ट प्रवासीही मान्य करतात. मात्र बेस्टच्या पथ्थ्यावर असलेली एकमेव गोष्ट म्हणजे बेस्टचे तिकीट दर कमी आहेत. सध्या वांद्रे-कुर्ला संकुल परिसरात जाणाऱ्या बेस्टच्या फक्त दोनच वातानुकुलित सेवा आहेत. यातील एक (एएस-५) ही कॅडबरी जंक्शन, ठाणे येथून सुटते. हे अंतर २९.४ किमी असून त्यासाठी बेस्ट केवळ ८१ रुपये आकारते. दुसरी सेवा गोराई आगारापासून (ए-७७ एक्सप्रेस) असून हे अंतर २९.२ किमी एवढे आहे. याचे तिकीट ९५ रुपये आहे. या तुलनेत कांदिवली ते वांद्रे-कुर्ला संकुल या २६ किलोमीटर अंतरासाठी एसटी १४० रुपये आकारत आहे.
बेस्टचा तिकीट दर कमी असला, तरीही ‘शिवनेरी’ हे नाव अधिक विश्वासार्ह आहे. त्यामुळे लोक शिवनेरीला जास्त पसंती देतील. प्रायोगिक तत्त्वावरील ही सेवा यशस्वी झाली, तर पुढे लोअर परळ ते बोरिवली, लोअर परळ ते ठाणे अशा मार्गावर बससेवा सुरू करण्याचाही आपला विचार असल्याचे, एसटीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. मात्र एसटीच्या या आव्हानाचा सामना करण्यास बेस्टने काय तयारी केली आहे, याची माहिती बेस्ट प्रशासनाची संपर्क साधूनही मिळू शकली नाही.
‘शिवनेरी’च्या मुंबई प्रवेशाने‘बेस्ट-एसटी’ संघर्षांची नांदी
एसटी महामंडळाने मुंबईतील ‘वांद्रे-कुर्ला संकुल ते कांदिवली’ या मार्गावर शिवनेरी सेवा सुरू करण्याचे सुतोवाच केल्यानंतर आता ‘बेस्ट’पुढील समस्या वाढणार आहे. या पहिल्या प्रायोगिक तत्त्वावरील सेवेद्वारे एसटीने मुंबईतही हातपाय पसरण्याची नांदी
First published on: 09-07-2013 at 08:14 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivneri bus in mumbai fight in between best and st buses