दलदलीच्या ठिकाणी टाकण्यात आलेल्या महालक्ष्मीच्या साडय़ा व ओटीचे साहित्य शिवसैनिकांनी शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपविण्याचा प्रयत्न केला. यातून प्रशासन व शिवसैनिकांमध्ये वादावादी झाली.
प्रशासनाने ते साहित्य ताब्यात घेण्यास नकार दिल्याने शिवसेनेच्या वतीने त्यांचा निषेध नोंदविण्यात आला. तेथे उपस्थित असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी १० गठ्ठे इतके साडी व ओटीचे साहित्य ताब्यात घेतले. संबंधितांची चौकशी करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
    महालक्ष्मीला अर्पण करावयाच्या साडय़ा, ओटीचे साहित्य दोन दिवसांपूर्वी अभिनेता राज कपूर पुतळ्याजवळ  उघडय़ावर टाकण्यात आले होते. बाजूला जमीन सपाटीकरणाचे काम सुरू असल्याने त्याची दलदल या साहित्यावर येऊन पडत होते. याची माहिती मिळाल्यानंतर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे, उपशहर प्रमुख दत्ता टिपुगडे आदींनी हे साहित्य गोळा केले. त्यांनी हा प्रकार करणाऱ्यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली होती. दरम्यान शिवसैनिकांनी गोळा केलेल्या साडी व ओटीचे साहित्य १० कापडांच्या गठ्ठयामध्ये भरले होते.  सुमारे टेम्पोभर साहित्य शुक्रवारी शिवसैनिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आणले होते. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, संदीप पाटील, दत्ता टिपुगडे, हर्षल सुर्वे आदींनी साहित्य जिल्हा प्रशासनाने  ताब्यात घ्यावे, अशी मागणी केली. महालक्ष्मी मंदिराच्या सचिवपदाचा पदभार निवासी जिल्हाधिकारी संजय  पवार यांच्याकडे आहे, त्यांनी हे साहित्य ताब्यात घ्यावे अशा घोषणा शिवसैनिकांनी दिल्या. मात्र ते बैठकीत असल्यामुळे बाहेर येऊ शकले नाहीत. संतापलेल्या शिवसैनिकांनी घोषणाबाजी सुरू केल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले. शिवसैनिकांनी निवासी जिल्हाधिकारी संजय पवार यांचा निषेध नोंदविला. हा वाद वाढू नये यासाठी पोलिसांनी मध्यस्थी केली. पोलीस उपअधीक्षक महेश सावंत, पोलीस निरीक्षक यशवंत केडगे यांनी शिवसैनिकांचा राग शमविला. त्यांनी साहित्याचे दहा गठ्ठे ताब्यात घेतले. हे साहित्य उघडय़ावर कोणी टाकले त्याचा शोध घेऊन कारवाई करण्याचे आश्वासन सावंत यांनी दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा