तडजोडीच्या राजकारणामुळे चुरशीच्या ठरलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या १४ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादीने तीन तर मनसे व शिवसेनेने प्रत्येकी चार जागांवर विजय संपादीत केला. तिसऱ्या महाजला दोन व मालेगाव विकास आघाडीला एका जागेवर समाधान मानावे लागले. मनसेने भाजपसमवेत तर शिवसेनेने काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत सहमतीचे राजकारण करत या जागा पदरात पाडल्याचे दिसत आहे.
जिल्हा नियोजन समितीत जिल्हा परिषदेच्या सर्वच्या सर्व म्हणजे २५ जागा यापूर्वीच निवडल्या गेल्या आहेत. महापालिकेच्या १३ व नगरपालिकांची एक अशा १४ जागांसाठी सोमवारी मतदान झाले. या जागांसाठी एकूण २६ उमेदवार रिंगणात होते. महापालिका निवडणुकीसाठी २०८ तर नगरपालिकांसाठी १६४ मतदार होते. मंगळवारी सकाळी मतमोजणीला सुरूवात झाली. महापालिका अर्थात मोठय़ा नागरी गटात शिवसेनेच्या ताईबाई म्हसदे, मिनाबाई काकळीज, शोभा फडोळ व उत्तम दोंदे तर मनसे व भाजप आघाडीच्या शीतल भामरे, सुरेखा भोसले, डॉ. राहुल आहेर व सलीम शेख हे विजयी झाले. काँग्रेसचे दिनकर पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिन दराडे व रूपाली गावंड यांनी विजय मिळविला. तिसऱ्या महाजचे एजाज. अहमद मो. उमर व अतिया बानो जलील तर मालेगाव विकास आघाडीचे मदन गायकवाड हे विजयी झाले. मनसेच्या सविता काळे यांना अवघ्या एका मताने पराभव पत्करावा लागला.
मालेगावमध्ये तिसरा महाजला दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा करून परस्परांना मदत करण्याचे धोरण निश्चित केल्याचे सेनेने मान्य केले होते. त्याची प्रचिती निकालानंतर आली. युती झाल्यामुळे खुल्या प्रवर्गातील महिला-पुरूष गटासाठी चार जागांसाठी ५१ मतांचा कोटा राहिला तर नागरिकांचा मागासवर्गीय प्रवर्गाच प्रत्येक दोन जागांसाठी १०१ मतांचा कोटा होता. मतदानापूर्वी तिसरा महाज, मनसे आणि भाजपची आघाडी होईल, अशी शक्यता वर्तविली जात होती. मात्र, ही बोलणी निष्फळ ठरली आणि मनसे व भाजपने आघाडी करून चार जागांवर विजय संपादीत करण्यात यश प्राप्त केले.
शिवसेना व मनसेला प्रत्येकी चार, तर काँग्रेस आघाडीला तीन जागा
तडजोडीच्या राजकारणामुळे चुरशीच्या ठरलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या १४ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादीने तीन तर मनसे व शिवसेनेने प्रत्येकी चार जागांवर विजय संपादीत केला.
First published on: 13-02-2013 at 01:53 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena and mns got each four congress gets three seats