शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या ‘टाळी’ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अद्यापही हात पुढे केलेला नाही. त्यामुळे दोन्ही नेते राजकीय आखाडय़ात एकत्र येतील का, याविषयी अद्यापही प्रश्नचिन्ह आहे. मात्र, असे असले तरी ठाण्यातील दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना ‘टाळी’ दिली असून आपल्या नेत्यांनीही एकत्र यावे, अशी भावना त्यांनी ‘जनखाद्य’च्या माध्यमातून व्यक्त केली आहे. ठाण्यातील शिवसेना (युवा सेना) आणि मनसेच्या दोन कार्यकर्त्यांनी ‘दोस्ती फास्ट फूड’ या नावाची हातगाडी सुरू केली असून त्या गाडीवर दोन्ही नेत्यांची छायाचित्रे लावण्यात आली आहेत. त्यामुळे राजकीयदृष्टय़ा शिवसेना-मनसे युती झाली नसली तरी ठाण्यात मात्र ‘दोस्ती’ झाल्याचे चित्र आहे.
ठाणे येथील ज्ञानेश्वरनगर भागातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उप-शाखाप्रमुख प्रशांत पालांडे आणि सावरकरनगर येथील शिवसेनाचे (युवा सेना) कायकर्ते संदीप राऊळ या दोघांनी एकत्र येऊन ‘जनखाद्य’ विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. वागळे इस्टेट भागात त्यांनी ‘दोस्ती फास्ट फूड’ या नावाने व्यवसाय सुरू केला असून त्यासाठी त्यांनी विशिष्ट प्रकारची हातगाडी तयार करून घेतली आहे. या गाडीवर त्यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन्ही नेत्यांची छायाचित्रे लावली आहेत. या व्यवसायाचा शुभारंभ करताना छापण्यात आलेल्या निमंत्रण पत्रिकेवर दिवगंत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांच्यासह उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची छायाचित्रे होती. या पत्रिका त्यांनी ठाण्यातील दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांना दिल्या असून त्या पाहून नेतेही अचंबित झाले आहेत. सोमवार (आज)पासून त्यांनी ‘जनखाद्य’ विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे.  दोन्ही नेते एकत्र आले तर व्यवसाय करणाऱ्या मराठी तरुणांना अधिक बळ मिळेल आणि ते चांगला उत्कर्ष करू शकतील. त्यामुळे दोन्ही नेत्यांनी एकत्र यावे, या भावनेतूनच त्यांचे पोस्टर लावून ‘दोस्ती’ या नावाने व्यवसाय सुरू केल्याचे प्रशांत पालांडे आणि संदीप राऊळ या दोघांनी स्पष्ट केले.

Story img Loader