मनसे प्रमुख राज ठाकरे हे आठवडयाभराच्या आगामी विदर्भ दौऱ्यात केवळ अमरावतीलाच एका जाहीर सभेत बोलणार असून दौऱ्याच्या उर्वरित दौऱ्यात शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यांना भेटी देऊन आगामी रणनिती आखणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. येत्या १७ ते २५ मार्च दरम्यान राज ठाकरे विदर्भ दौऱ्यावर येत आहेत. अमरावती विभागातील जिल्ह्य़ातील पक्षनेत्यांशी २० मार्च पासून ते संवाद साधणार असून २४ मार्चला अमरावतीच्या जाहीर सभेत बोलतील. वर्धा जिल्हा मुख्यालयी त्यांची उपस्थिती राहणार नाही. मात्र, १८ मार्चला हिंगणघाट येथे त्यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. याच दिवशी वणी येथेसुध्दा त्यांची बैठक आहे. जिल्हयात हिंगणघाट विधानसभा क्षेत्र हे काँग्रेसविरोधकांचे शक्तीस्थळ समजल्या जाते. विद्यमान सेना आमदार अशोक शिंदे  तिसऱ्यांदा निवडून आले असून हे क्षेत्र आघाडीच्या वाटाघाटीत राष्ट्रवादी काँग्रेसला आंदण आहे.
वणी येथेही मनसेचा बोलबाला आहे. पालिकेत सात नगरसेवक असून मनसेविरोधात सेना-भाजप अपक्षांनी आघाडी करीत पालिकेची सत्ता हस्तगत केली. राज ठाकरे यांची चंद्रपूर-गडचिरोली जिल्हयाची बैठक चंद्रपूरलाच आहे. भंडारा व नागपूरलाही पदाधिकाऱ्यांनी बैठक असून चंद्रपूरला मनसेचा जि.प.सभापती तर नागपूर महानगर पालिकेत दोन नगरसेवक आहेत. जिल्हानिहाय बैठकी असतानाच वणी व हिंगणघाट या तालुकास्थळी विशेष बैठका ठेवण्यात आल्याने सेना व राष्ट्रवादी कॉग्रेसच्या बालेकिल्ल्यास सुरूंग लावण्याची मनसेची व्यूहरचना दिसून येते. ठाकरे यांनी कोकण दौरा करताना राज्यातील पक्षाचा एकमेव नगराध्यक्ष असणाऱ्या खेडची निवड जाहीर सभेसाठी केली होती. पक्षाला ज्या ज्या ठिकाणी पालवी फु टली आहे त्या ठिकाणी अधिक खबरदारी घेण्याचे सूत्र यामागे असल्याचा अंदाज राजकीय वर्तुळात बांधण्यात आला आहे.
मनसेचे पूर्व विदर्भ संघटक हेमंत गडकरी म्हणाले, कुणाला लक्ष्य करून राजसाहेबांचा दौरा आयोजित केलेला नाही. पक्षबांधणीसाठी सर्वच ठिकाणी ते भेटी देणार आहे. त्यांचे दौरे झाले नसतांनाही विदर्भात मनसेची लक्षणीय उपस्थिती आहे. नागपूर महानगर पालिकेत गतवेळी ७० हजार मते मनसेने घेतली. विदर्भात मनसेचे २८ सरपंच तसेच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सभापतीदेखील आहेत. वणी दौरा आटोपून ते नागपूरला जाणार असून वाटेत हिंगणघाटला थांबतील, असा खुलासा गडकरी यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना केला.
राज ठाकरेंच्या आगामी दौऱ्याच्या पाश्र्वभूमीवर हेमंत गडकरी यांनी वध्र्यात आढावा बैठक घेतली. तसेच हिंगणघाटला महिला मेळाव्याचे आयोजन झाले. सेना व राकाँच्या बालेकिल्ल्यात धडक देण्याची बाब गडकरी यांनी नाकारली असली तरी हिंगणघाट, वणी, वरोरा, चंद्रपूर आणि २० मार्चनंतर अमरावती विभागातील ठाकरेंचे दौरे हीच बाब अधोरेखित करतात. अमरावती हा सेनेचा बालेकिल्ला म्हणून प्रस्थापित झाला आहे. त्याचठिकाणी विदर्भातील एकमेव जाहीर सभा दिल्याने राज ठाकरेंच्या दौऱ्याची रणनिती स्पष्ट झाली आहे.