गाळप थांबवण्यासाठी आंदोलने सुरू
जनावरांना चाऱ्यासाठी ऊस ठेवण्याची मागणी
दुष्काळाच्या पाश्र्वभुमीवर जनावरांच्या चाऱ्यासाठी ऊस शिल्लक रहावा, त्यासाठी साखर कारखान्यांनी आता गाळप थांबवावे अशी मागणी करीत शिवसेनेने आज जिल्ह्य़ातील तीन साखर कारखान्यांवर आंदोलने करीत काही काळ हे कारखाने बंद पाडले, तर काही ठिकाणी कारखान्याचे प्रवेशद्वारच बंद करण्यात आले. श्रीगोंदे सहकारी, पालकमंत्र्यांचा शालगी साईकृपा (दोन्ही श्रीगोंदे) आणि कर्जत तालुक्यातील अंबालिका (राशिन) या तीन कारखान्यांवर आज आंदोलने करण्यात आली.
पक्षाचे जिल्हाप्रमुख शशीकांत गाडे यांच्या नेतृत्वाखाली श्रीगोंदे साखर कारखान्याची गव्हाण बंद पाडण्यात आली, तर साईकृपा कारखान्याचे (हिरडगांव) प्रवेशद्वार एक तास बंद ठेवण्यात आले. कुकडी कारखान्याच्या प्रवेशद्वारावरही आंदोलन करण्यात आले. कर्जत तालुक्यातील अंबालिका कारखान्यावर स्थानिक शिवसेनेने आंदोलन केले.
आज दुपारी एक वाजता शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, उपप्रमुख राजेंद्र दळवी, निलेश लंके, संदेश कार्ले, बाळासाहेब काटे, नंदु ताडे, भाऊसाहेब गोरे, महिला अघाडीच्या कदम यांच्या उपस्थितीत श्रीगोंदे तालुक्यात आंदोलन केले. प्रथम हिरडगाव येथील साखर कारखान्याचे प्रवेशद्वार बंद करून घेण्यात आले. त्यांनतर आंदोलकांनी श्रीगोंदे कारखान्याकडे मोर्चा वळवला. येथे आंदोलक थेट कारखान्यातच घुसले व त्यांनी गव्हाण बंद पाडली. सुमारे अर्धा तास गव्हाण बंद होती. व्यवस्थापनाने कारखाना येत्या दि. १० पासून बंद ठेवण्यात येईल असे जाहीर केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
कर्जत तालुका शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी अंबालिका कारखान्यावर आंदोलन केले. जामखेडचे माजी जि. प. सदस्य मधुकर राळेभात, कर्जतचे तालुकाप्रमुख बळीराम यादव, दिपक शहाणे, दिगंबर चव्हाण, गुलाब तनपुरे आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. पक्षाच्या वतीने कारखान्याच्या व्यवस्थापनाला निवेदन देऊन कारखान्याचे गाळप बंद करण्याची मागणी करण्यात आली. उद्यापासूनच कारखाना बंद करण्याची मागणी या आंदोलकांनी केली असून त्यासाठी तीव्र आंदोलनाचाही इशाराही देण्यात आला आहे.