कल्याण-डोंबिवली पालिकेच्या महापौर, उपमहापौरपदासाठी येत्या शनिवार होत असलेल्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजप या दोन्ही मित्र पक्षांचे उमेदवार जेमतेम दहावी उत्तीर्ण आहेत. शिवसेनेतर्फे महिला ओबीसी संवर्गातील नगरसेविका कल्याणी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्या दहावी उत्तीर्ण असून पतीसह त्यांची एकूण मिळकत १८ लाख रुपये आहे, तर भाजपचे उपमहापौर पदाचे उमेदवार नगरसेवक राहुल दामले हे व्यवसायाने बिल्डर आहेत. त्यांचे शिक्षण स.वा.जोशी शाळेत इयत्ता दहावीपर्यंतच झाले आहे.
दामले यांची पत्नी गौरी यांच्यासह एकूण संपत्ती व स्थावर मिळकत ८२ लाख ९५ हजार रुपयांची आहे. अलिबागजवळील रेवती, नागाव येथे १६ लाखाची जमीन आहे. डोंबिवलीच्या श्री गणेश मंदिर संस्थानचे ते विश्वस्त आहेत. पेंडसेनगर प्रभागाचे ते नगरसेवक आहेत. महापालिका निवडणुका दरम्यान निवडणूक अधिकाऱ्यांना सादर केलेल्या शपथपत्रात या दोन्ही उमेदवारांनी ही सविस्तर माहिती दिली आहे. महापौरपदासाठी विजयाच्या प्रबळ दावेदार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कल्याणी पाटील या गृहिणी आहेत. त्यांच्याकडे कोणत्याही स्वरूपाची स्थावर मालमत्ता नाही. शहापूर तालुक्यातील वासिंद येथील सरस्वती हायस्कूलमधून १९९२ मध्ये त्या दहावी पास झाल्या आहेत.
पाटील यांच्यावर टांगती तलवार!
शिवसेनेच्या महापौरपदाच्या उमेदवार कल्याणी पाटील यांच्या शाळेच्या दाखल्यावर ‘हिंदू मराठा’ असा उल्लेख आहे. तर निवडणूक अधिकाऱ्यांना सादर केलेल्या पत्रात त्यांनी ‘कुणबी’ जातीचा उल्लेख केला आहे. याप्रकरणी पाटील यांच्या पालिका निवडणुकीतील प्रतिस्पर्धी उमेदवार अॅड. सारिका शेलार यांनी कल्याण न्यायालयात अडीच वर्षांपूर्वी याचिका दाखल केली आहे. २ जुलै रोजी याप्रकरणी सुनावणी होणार आहे, असे शेलार यांनी सांगितले. कल्याणी पाटील यांनी मात्र आपली जातविषयक कागदपत्रे योग्य आहेत असे सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा